स्थानिक तरुणांना नोकरीच्या संधींवर भर

पणजी : गोव्यासाठी (Goa) स्वतंत्र पोस्टल सर्कल (Indepedent Postal Circle) स्थापन करण्याची मागणी राज्यसभेचे (Rajyasabha) खासदार सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी राज्यसभेत केली. सध्या गोवा महाराष्ट्र (Maharashtra) पोस्टल सर्कल अंतर्गत येत असल्याने; राज्याच्या प्रशासनीक, भाषीक आणि सामाजिक गरजा पूर्ण होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यातील तरुणांना नोकरी मिळण्याच्या संधींवर त्यांनी भर दिला.
सभागृहाचे लक्ष वेधताना तानावडे यांनी हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला मुद्दा असल्याचे सांगितले. स्वतंत्र राज्य असतानाही गोवा अजूनही दुसऱ्या राज्याच्या पोस्टल प्रशासनाखाली असल्यामुळे सेवा वितरणात अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भरती प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, पोस्टल सेवांमधील भरती सर्कल स्तरावर होत असल्याने; मोठ्या राज्यांतील उमेदवारांना अधिक संधी मिळतात. त्यामुळे गोव्याच्या स्थानिक तरुणांना नोकरीच्या संधी कमी प्रमाणात मिळतात आणि त्यांच्या प्रतिनिधित्वावर मर्यादा येतात.
तसेच बाहेरून नियुक्त झालेले कर्मचारी अल्पावधीतच बदली घेऊन आपल्या मूळ राज्यात परत जातात. यामुळे वारंवार रिक्त पदे निर्माण होतात. या रिक्त जागा तात्पुरत्या व्यवस्थेद्वारे भराव्या लागतात. ज्याचा परिणाम पोस्टल सेवांच्या कार्यक्षमतेवर, सातत्यावर आणि विश्वासार्हतेवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्याचा भौगोलिक आकार लहान असल्याने स्वतंत्र पोस्टल सर्कल अधिक कार्यक्षम आणि नागरिक-केंद्रीत ठरू शकते, असेही तानावडे यांनी अधोरेखित केले.
शेवटी, गोव्यासाठी स्वतंत्र पोस्टल सर्कलची तात्काळ स्थापना करण्याची मागणी करत त्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे प्रशासन अधिक सक्षम होईल, सेवा वितरण सुधारेल आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळेल.