
पणजी : राज्यात कर्करोग, मधुमेह, मूत्रपिंड (किडनी) आणि यकृताशी (लिव्हर) संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा आजारी पडल्यावरच उपचार घेतले जातात; मात्र आजार होऊच नये, यासाठी 'आयुष' ही एक उत्तम प्रतिबंधात्मक उपचार पद्धती असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गुरुवारी सचिवालयातील 'आयुष वेलनेस केंद्रा'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मुख्य सचिव व्ही. कांदावेलू, सचिव यतिंद्र मरळकर आणि डॉ. मीनल जोशी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि दर्जेदार आरोग्य सेवांवर भर देण्यासाठी हे वेलनेस केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा प्रामुख्याने सचिवालयातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. कर्मचाऱ्यांनी आयुर्वेदात नमूद केल्याप्रमाणे आपली प्रकृती समजून घ्यावी, तसेच योग व प्राणायाम शिकून त्याची दैनंदिन जीवनात अंमलबजावणी करावी. कर्मचारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहावेत, हाच हे केंद्र सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
सचिवालयातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कामानिमित्त येथे येणाऱ्या अन्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही या केंद्राचा लाभ घेता येईल, असे त्यांनी नमूद केले. येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयुष डॉक्टर उपलब्ध असतील आणि गरज भासल्यास इतर तज्ज्ञ डॉक्टरांनाही पाचारण केले जाईल. राज्य सरकारने टाटा कर्करोग संशोधन रुग्णालयासोबत सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच गोमेकॉत लवकरच 'आयुष ओपीडी' सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्यभरात २८ केंद्रांची सुरुवात
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी माहिती दिली की, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने राज्यभरात २८ आयुष वेलनेस केंद्रे याआधीच कार्यान्वित करण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांत गोव्याने आरोग्य क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून नवीन रुग्णालयांचे उद्घाटन होत आहे. आधुनिक आरोग्य सेवा आणि सुविधा पुरवण्यात गोवा राज्य देशात आघाडीवर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.