
पणजी : देशातील प्रथमच डिजिटल पद्धतीने होणाऱ्या जनगणना प्रक्रियेला आजपासून सुरू झाली. गोव्यात गृह जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते १५ मे दरम्यान होणार आहे. यामध्ये १ ते १५ एप्रिल दरम्यान पोर्टलवर जाऊन स्वयंनोंदणी करता येईल. बुधवारी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी मोबाईल वरून स्वयंनोंदणी पद्धतीने आपली माहिती अपलोड केली. गोवा तसेच संपूर्ण देशाची ध्येय, धोरणे ठरवण्यासाठी जनगणना महत्त्वाची असल्याने सर्व नागरिकांनी सक्रियपणे या प्रक्रियेत सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जनगणना ही केवळ एक सांख्यिकीय प्रक्रिया नाही. तर ती प्रभावी नियोजन, सर्वसमावेशक शासन आणि प्रत्येक नागरिकाच्या गरजा ओळखून त्या पूर्ण केल्या जातील याची खात्री करण्याचा पाया आहे. देशातील तसेच राज्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण, सामाजिक कल्याणकारी योजनांसाठी सरकारकडे अचूक माहिती असणे आवश्यक असते. मजबूत आणि प्रगतीशील गोवा व देशासाठी ही माहिती महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करते. जनगणनेच्या माध्यमातून सरकारला ही माहिती मिळणार आहे.
ते म्हणाले, समाजातील प्रत्येक आवाज गोवा आणि पर्यायाने भारताचे भविष्य घडवत असतो. गोव्यात आजपासून स्वयं नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत सहभागी होऊन गोवा राज्य देशासाठी एक व्यापक, अचूक माहिती-संच तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये सामील झाले आहे. सर्व नागरिकांना या महत्त्वाच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होणे आवश्यक आहे. लोकांनी १५ एप्रिलपर्यंत उपलब्ध असलेल्या स्वयं नोंदणी सुविधेचा लाभ घ्यावा. लोकांच्या खऱ्या आकांक्षा दर्शवणारी धोरणे तयार करण्यासाठी जनगणनेमध्ये प्रत्येकाचा सहभाग अत्यावश्यक आहे.