
पणजी : मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा राज्याच्या जीएसटी (GST) संकलनात २.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यातील जीएसटी संकलन ६,०६७ कोटी रुपये होते, जे २०२५-२६ मध्ये वाढून ६,२०४ कोटी रुपये झाले आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये केंद्र सरकारने जीएसटी दरात केलेल्या कपातीमुळे राज्याच्या एकूण संकलनात किंचित घट दिसून आली आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात २०२०-२१ मध्ये ३,२७० कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. त्यानंतर २०२१-२२ मध्ये ४,३६४ कोटी, २०२२-२३ मध्ये ५,५२० कोटी, तर २०२३-२४ मध्ये ६,४७५ कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. गेल्या काही वर्षांत राज्यातील पर्यटन आणि इतर पूरक व्यवसायांमध्ये झालेली वाढ, हे जीएसटी संकलन वाढण्याचे मुख्य कारण मानले जात आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील मासिक आकडेवारीनुसार, सर्वाधिक ८०६ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन एप्रिल महिन्यात झाले होते. याउलट, डिसेंबर २०२५ मध्ये सर्वात कमी म्हणजेच ३६५ कोटी रुपये संकलित झाले. इतर महिन्यांचा विचार करता, नोव्हेंबरमध्ये ३९७ कोटी, सप्टेंबरमध्ये ५३५ कोटी, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी ५४५ कोटी, जूनमध्ये ५५१ कोटी, जुलैमध्ये ५८६ कोटी, तर मे महिन्यात ५८७ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे.
| महिना | २०२४ - २५ | २०२५ - २६ |
| एप्रिल | ७६५ | ८०६ |
| मे | ५१९ | ५८७ |
| जून | ५४६ | ५५१ |
| जुलै | ५९३ | ५८६ |
| ऑगस्ट | ५३१ | ५४५ |
| सप्टेंबर | ५१९ | ५३५ |
| ऑक्टोबर | ५५९ | ५४५ |
| नोव्हेंबर | ३९४ | ३९७ |
| डिसेंबर | ३७८ | ३६५ |
| जानेवारी | ४८२ | ४६१ |
| फेब्रुवारी | ४०३ | ४३० |
| मार्च | ३७८ | ३९६ |
| एकूण संकलन | ६०६७ | ६२०४ |