देवाचे शिवलिंग स्थापना करण्यात पुढाकार घेतलेला मुळकेश्वर हा देवळाच्या मागच्या बाजूस उभा असलेला पहावयास मिळतो. हा नवसाला पावतो अशी श्रद्धा आहे. भाविक त्याला विडीचा नवस करतात. शिवाय भेट म्हणून कच्ची केळी व विडी ठेवण्याची प्रथा आहे. यालाच 'धूळभेट' असे म्हटले जाते.

निसर्गाचे वरदान लाभलेल्या देव-देवतांनी पावन झालेल्या आपल्या गोव्याच्या पवित्र भूमीमध्ये अनेक पर्यटन स्थळे पहावयास मिळतात. म्हार्दोळची महालसा, केरीची विजयादुर्गा, मंगेशीचा मंगेश अशी कितीतरी प्रेक्षणीय मंदिरे पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. वर्षातून हजारो पर्यटक या मंदिरांना भेटी देतात व डोळ्यांचे पारणे फिटणाऱ्या येथील निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेतात. श्री मंगेश देवस्थान हे फोंडा तालुक्यात प्रियोळ गावात मंगेशी येथे आहे. या मंदिराच्या बांधकामाचे नक्षीकाम अतिशय विलोभनीय असे आहे. शिवाय येथील मंदिराचा दीपस्तंभ तर अतिशय कलात्मक ! याचे बांधकाम आतून पोकळ असून मोठमोठ्या इमारतींच्या मजल्याप्रमाणे केलेले आहे. यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. या दिपस्तंभावर दर सोमवारी दिव्यांची आरास केलेली पहावयास मिळते.
मंगेश देवाच्या जत्रोत्सवाला रथसप्तमीपासून सुरुवात होते, विजयरथ, नौकाविहार, सुखासन, रथ अंबारी, छोटा रथ, महारथ अशा विविध आसनात बसवून श्रींची मंदिराच्या प्रांगणात मिरवणूक काढली जाते. मंदिरासमोर असलेल्या तळीमध्ये नौकाविहाराचा कार्यक्रम होतो. माघ शु. पौर्णिमा हा जत्रेचा शेवटचा दिवस. यालाच महापर्वणी असेही म्हणतात. या दिवशी पहाटे चार वाजता नगारखान्यात चौघडा वाजू लागतो. बैंडवादनासह श्री मंगेशाची मिरवणूक निघते. जवळ जवळ २५ फूट उंच व कलात्मकतेने सजवलेल्या महारथामध्ये आरूढ झालेली श्रींची मूर्ती पाहून खरोखरच कैलासाधिपती अवतरल्याचा भास होतो. पहाटेची साखरझोपेची वेळ असूनदेखील भाविकांची इथे अलोट गर्दी दिसून येते. रथातील श्री मंगेशाची आरती झाल्यानंतर शिस्तीत भक्तजनांकडून रथावर नारळ वाढविले जातात, नारळ वाढवून झाल्यानंतर 'हर हर महादेव'च्या गजरात रथ ओढायला सुरुवात होते. मंदिर प्रदक्षिणेत रथ आठ ठिकाणी थांबतो. प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत उजाडलेले असते, महाआरती होऊन डोळे दिपवून टाकणाऱ्या या उत्सवाची सांगता होते.
तसे पाहिले तर या देवळात वर्षभर उत्सव चालूच असतात. रोज सकाळी पूजा अर्चा, अभिषेक, लघुरूद्र केले जातात. प्रत्येक सोमवारी श्रींची पालखीतून मिरवणूक काढली जाते. शिवाय अक्षय तृतीया, गुढीपाडवा, अनंतव्रत, रामनवमी, नवरात्र, दसरा, दिवाळी, महाशिवरात्री असे उत्सव साजरे केले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी खास काशीहून आणलेल्या गंगाजलाने शिवपिंडीवर अभिषेक केला जातो.
गोमंतभूमी म्हणजेच पूण्यभूमी. असे म्हटले जाते की या पूण्यभूमीचे आकर्षण देवाधिकांनाही वाटल्यामुळे, हजारो कोस दूर असलेल्या हिमगिरी पर्वत शिखरावर वास्तव्य करणारे शिव-शंकर गृहकलहाच्या निमित्ताने गोव्यामध्ये आले. शंकराची कितीतरी मंदिरे इथे पहावयास मिळतात. हरवळे, नार्वे, खांडेपार येथील शंकराची देवस्थाने तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. श्री शंकराला महादेव, मंगेश, चंद्रेश्वर, गणनाथ, भोलेनाथ, रामनाथ, आदिनाथ, मांगिरीश अशा कितीतरी नावांनी ओळखले जाते.
मांगिरीश हे नाव कसे पडले याबद्दल एक आख्यायिका आहे. असे सांगितले जाते की, शिव-पार्वती सारीपाट खेळत असताना त्यांच्यात भांडण झाले आणि हिमालयावर वास्तव्य करणारे महादेव कुशस्थळी म्हणजे आजच्या कुठ्ठाळी गावात आले. त्यांच्या पाठोपाठ पार्वती माताही तेथे आली. ती एका घनदाट अरण्यात पोहोचली. अचानक तिच्यासमोर एक अक्राळ-विक्राळ वाघ उभा ठाकला. त्याला बघून तिची घाबरगुंडी उडाली.
तिने देवाचा धावा सुरू केला आणि त्राही मां गिरीशां (आता तूच माझा तारणकर्ता आहेस) असे म्हटले. त्याचक्षणी वाघाने रूप धारण केलेले कैलासाधिपती शिव-शंकर तिथे प्रगट झाले, यावरूनच त्यांना मांगिरीश हे नाव पडले आणि पुढे मंगेश हे नाव प्रचलित झाले. या घनदाट जंगलात गुराखी आपली गुरे चरायला घेऊन जात असत. त्यांनी पाहिले की वासरू बरोबर नसतानादेखील एक गाय रोज एका ठराविक जागेवर आपल्या पान्हातून दुधाचा अभिषेक करत आहे. गुराख्याने शोध घेतला असता त्याला तिथे शिवलिंग असल्याची जाणीव झाली. नंतर त्याने आपल्या साथीदारासह या ठिकाणी मंदिर उभारले.
देवाचे शिवलिंग स्थापना करण्यात पुढाकार घेतलेला मुळकेश्वर हा देवळाच्या मागच्या बाजूस उभा असलेल्या पहावयास मिळतो. हा नवसाला पावतो अशी श्रद्धा आहे. भाविक त्याला विडीचा नवस करतात. शिवाय भेट म्हणून कच्ची केळी व विडी ठेवण्याची प्रथा आहे. यालाच 'धूळभेट' असे म्हटले जाते.
१५१० मध्ये व्यापार व धर्मप्रसार ही उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून पोर्तुगीज गोव्यामध्ये आले. त्यांनी तेथील श्रद्धाळू व भाविक लोकांच्या जीवनात असलेल्या देवस्थानांबाबतच्या धार्मिक भावना ओळखल्या. आपले धर्मप्रसाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी येथील शेकडो मंदिरे गाभाऱ्यातील मूर्तीसकट मोडून तोडून जमीनदोस्त करायला सुरुवात केली. बाटवाबाटवी, मंदिराची नासधूस, मूर्तीचा विध्वंस या प्रकाराने हिंदूबांधव भयभित झाले. त्यांनी जीवाची पर्वा न करता देव-दैवतांच्या मूर्ती घेऊन अशा ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली. आपल्या दैवताला याची झळ लागू नये म्हणून कुठ्ठाळी गावातील काही लोकांनी शिवलिंग घेऊन गुपचूपपणे प्रियोळ गाव गाठला व मंगेशी येथे मंगेशाची स्थापना केली. कुठ्ठाळीहून माघ महिन्यात श्री मंगेशाचे आगमन झाल्यामुळे या महिन्यात जत्रोत्सवाचे आयोजन असते. गोव्यात व गोव्याबाहेरही श्री मंगेश देवाचे विखुरलेले भक्तगण आपल्या कुलदेवाच्या भेटीसाठी वर्षातून एकदा तरी इथे आवर्जून येतात.