ईडी अधिकारी असल्याचे सांगत व्यावसायिकाची लूट

अपहरण करुन नेले कारवारात : ३ लाख रुपयांना गंडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd April, 11:55 pm
ईडी अधिकारी असल्याचे सांगत व्यावसायिकाची लूट

मडगाव : अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी असल्याचे सांगत माकाझन येथून व्यावसायिकाला जबरदस्तीने गाडीत घालत अपहरण केले. यानंतर कारवारात नेऊन व्यावसायिकाकडील ३ लाखांची रोकड घेत पोबारा केला. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.

दक्षिण गोव्यातील एका व्यावसायिकाच्या अपहरणाच्या घटनेने आता व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. २४ मार्च रोजी माकाझान येथे ही अपहरणाची घटना घडली. व्यावसायिक अशोक कुमार (५६, रा. बोर्डा, फातोर्डा) यांनी मायना कुडतरी पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. याप्रकरणी अशोक कुमार यांनी नीलेश जाधव, बलराम शेट्टी, अजित आणि इतर काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली आहे.

अशोक कुमार हे २४ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास माकाझान येथे गेले असता, संशयितांनी त्यांना अडवले. त्यांना आपण अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी असल्याचे सांगितले व कोणतीही गडबड न करता आपल्यासोबत येण्यास सांगितले. संशयितांनी अशोक कुमार यांना त्यांच्या ह्युंदाई कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्यांना कर्नाटक येथील कारवार येथे नेले. कारवारातील एका निर्जनस्थळी अशोक कुमार यांना घेऊन जात त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील ३ लाखांची रक्कम हिसकावून घेतली. यानंतर अशोककुमार यांना निर्जनस्थळी सोडून संशयितांनी पळ काढला. याप्रकरणी व्यावसायिक अशोक कुमार यांनी नीलेश जाधव, बलराम शेट्टी, अजित आणि इतर काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली आहे. मायणा-कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी याप्रकरणी तपास करीत आहेत. 

हेही वाचा