अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल

पणजी : शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवून मुरगाव तालुक्यातील एक ज्येष्ठ नागरिकाला ३.१४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुरगाव तालुक्यातील ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराला ८८७०९९७००६, ८३७९९६९४०४, ९९६५३९१५५० आणि ९८८६६८५६५७ या मोबाईल व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. तसेच ‘इंडिया निवेश वेल्थ मॅनेजमेंट ’ कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. संबंधित संशयितांनी तक्रारदाराला ‘ ईडिनिव प्रो’ हे अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. तक्रारदाराला त्यात पैसे गुंतवल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी सांगितल्यानुसार तक्रारदाराने गुंतवणूक केली. याच दरम्यान तक्रारदाराला वरील अॅपमध्ये दोन कोटी रुपये जमा झाल्याचे दाखवण्यात आले. तक्रारदाराने वरील रक्कम काढण्यासाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. संशयिताने तक्रारदाराला ३१ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विविध प्रकारचे शुल्क, दंड तसेच इतर शुल्क भरायला लावले. त्यानुसार, तक्रारदाराने वेगवेगळ्या बँक खात्यांत सुमारे ३ कोटी १४ लाख ६ हजार ८१९ रुपये जमा केले. याच दरम्यान तक्रारदाराला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात धाव घेतली. आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात वॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात भा. न्या. संं.च्या कलम आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.