दुचाकीस्वार गंभीर जखमी : वाळपई-होंडा रस्त्यावरील घटना

वाळपई : साप आडवा आल्यामुळे त्याला वाचविण्यासाठी अचानक ब्रेक लावल्याने वाळपई–होंडा मार्गावरील रेडी घाट येथे तीन वाहनांचा अपघात घडला. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघात बुधवारी दुपारी घडला.
वाळपई भागातून साखळीच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार (जी.ए. ०३ पी ७९०४) रेडीघाट परिसरात पोहोचली असता तिच्या मागून मालवाहू ट्रक (जी.ए. ०४ टी ८२४४) येत होता. त्याच दिशेने एक दुचाकीही प्रवास करत होती. या दुचाकीस्वाराने प्रथम मालवाहू ट्रकला ओव्हरटेक केले व पुढे स्विफ्ट कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतानाच समोरून रस्ता ओलांडणारा साप दिसल्याने स्विफ्ट चालकाने अचानक ब्रेक लावला.
अचानक ब्रेक लागल्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकीने स्विफ्ट कारच्या मागील भागावर जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी रस्त्यावर कोसळली. याचवेळी मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकची धडक दुचाकीस्वाराला बसल्याने तो गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून जखमीला साखळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या विचित्र अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून मंगळवारीदेखील याच ठिकाणी एक कार उलटून अपघात झाला होता. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.