केपे प्रथमवर्ग न्यायालयाचा निर्णय : मोबाईलवर चित्रिकरण केल्याचाही आरोप

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याला १४ वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल बुधवारी केपे प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. याबाबतचा आदेश न्या. गिरीजा गावकर यांनी दिला.
कुडचडे परिसरातील मुलीने संशयित सोहम नाईक याच्याविरोधात गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली होती. त्यात संशयित सोहमने पीडित युवतीशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सदर घटनेचे मोबाईल फोनवर चित्रीकरण करून प्रसारित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेऊन महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांनी सोहमविरोधात पॉक्सो आणि गोवा बाल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
२२ मार्च रोजी कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरण उघडकीस आले होते. कुडचडे पोलिसांनी एका तक्रारीवरून गुन्हा दाखल करून संशयित सोहमला अटक केली होती. त्यानंतर इतर दोन मुलींनी तक्रार दिल्याने त्याच्यावर पॉक्सो आणि गोवा बाल कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. याच दरम्यान, हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. प्रथम गुन्ह्याचा तपास गुन्हा शाखेचे निरीक्षक परेश नाईक यांच्याकडे सोपविण्यात आला होता. संशयिताला शुक्रवारी बाल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला प्रथम चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर मंगळवारी पुन्हा त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली.
बाल न्यायालयाच्या मंजुरीनंतर सोहमला अटक
उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांनी अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी बाल न्यायालयात अर्ज दाखल करून सोहमची कोठडी मागितली. न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर संशियताला मंगळवारी वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याला बुधवारी केपे येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने सोहमला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. संशयित सोहमविरोधात पाच गुन्हे दाखल झाले आहेत.