घरगुती साहित्य जळून खाक : वाळपई अग्निशामकचे शर्थीचे प्रयत्न

वाळपई : सत्तरी तालुक्यातील खोतोडा ग्रामपंचायत क्षेत्रातील खडकी येथे श्रीराम मंदिराजवळ बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अनिल नाईक यांच्या घराला अचानक भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून संबंधित कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अनिल नाईक हे जुन्या घराच्या जागी नवीन घर बांधकाम करत होते. त्यामुळे घरातील सर्व सामान जवळच असलेल्या दोन खोल्यांमध्ये साठवून ठेवण्यात आले होते. नाईक कुटुंब सध्या अन्यत्र वास्तव्यास असून बुधवारी संध्याकाळी त्यांनी त्या ठिकाणी देवाला दिवा लावून तेथून ते निघून गेले होते. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याची घटना घडली.
आगीचे प्रमाण मोठे असल्याने स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने वाळपई अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. आगीची तीव्रता लक्षात घेता दुसरे अग्निशमन वाहनही मागविण्यात आले.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी ज्ञानेश्वर जी. गावस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काम केले. त्यांच्यासोबत आदम ए. खान (ड्रायव्हर ऑपरेटर), सत्यवान एन. गावस (फायर फायटर), रुपेश एस. सालेलकर (फायर फायटर) आणि साईनाथ जी. सावंत (फायर फायटर) यांनी मदत कार्य केले. तसेच दुसऱ्या अग्निशमन वाहनासाठी दत्ताराम आर. देसाई (सीनियर फायर फायटर) यांच्या नेतृत्वाखाली ड्रायव्हर ऑपरेटर महादेव एस. गावडे, फायर फायटर उमेश आर. गावणकर आणि फायर फायटर संदीप एल. गावणकर यांनी मदत केली.
घटनेची माहिती मिळताच नगरगाव ग्रामपंचायत तसेच जिल्हा पंचायत सभासद प्रेमनाथ दळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी अनिल नाईक यांच्या कुटुंबीयांना धीर देत आर्थिक मदतीसाठी शासन दरबारी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
दीड तासानंतर आग आटोक्यात
दोन अग्निशमन बंबांच्या साहाय्याने सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दोन्ही खोल्यांमधील कपडे, घरगुती साहित्य व इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. अग्निशामक दलाच्या माहितीनुसार, आगीने दोन्ही खोल्यांना चोहोबाजूंनी वेढले होते, त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.