उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढणार : पुरेसा पाणीसाठा असल्याचा जलस्रोत अधिकाऱ्यांचा निर्वाळा

अंजुणे धरणातील पाणीसाठा.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात गतवर्षीच्या एक एप्रिलच्या तुलनेत यंदा सहापैकी चार धरणांत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील साळावली, अंजुणे, चापोली, गावणे धरणांत गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. आमठाणे आणि पंचवाडी धरणांतील पाणीसाठा गत वर्षीपेक्षा अधिक आहे. एप्रिल आणि मे दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी राज्यातील सध्याचा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरेसा असल्याची माहिती जलस्रोत खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ रोजी दक्षिण गोव्याची तहान भागवणाऱ्या साळावली धरणात ५८.९ टक्के पाणीसाठा होता. १ एप्रिल २०२६ अखेरीस या धरणात ५३ टक्के पाणीसाठा आहे. अंजुणे धरणात मागील वर्षी ४४ टक्के, तर यावर्षी १ एप्रिल अखेरीस ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी गावणे धरणात ६६.३ टक्के, तर यावर्षी ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी पंचवाडीत ४४.७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी या धरणात ४६ टक्के पाणीसाठा आहे.
राज्यातील सहापैकी आमठाणे धरणात सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी १ एप्रिल रोजी आमठाणेत ३१.६ टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा १ एप्रिल अखेरीस आमठाणेत ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उत्तर गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तिळारी धरणाची क्षमता ४६ हजार २१७ हेक्टर मीटर असून १ एप्रिल २०२६ अखेरीस यामध्ये २३ हजार १३३ हेक्टर मीटर (५० टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
अंजुणे धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक
उत्तर गोव्यातील अंजुणे धरणातील पाणीसाठा समाधानकारक स्थितीत असून धरणामध्ये सुमारे ३६ टक्के पाणीसाठा आहे. पुढील दोन महिने पाणीटंचाई भासण्याची शक्यता नसल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्याची नासाडी रोखण्यासाठी करण्यात आलेले नियोजन आणि प्रभावी व्यवस्थापन यामुळे समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे. सध्या धरणात सुमारे १,६०२.६२ हेक्टर मीटर पाणीसाठा उपलब्ध असून पाण्याची पातळी ७९.२ मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. पावसाचे आगमन लांबले, तरीही पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
