दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न

कोलवाळ येथे गळती लागलेली मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम करताना कामगार.
म्हापसा : बार्देश तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या कोलवाळ येथील १ हजार मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती लागल्याने संपूर्ण तालुक्याचे पाणी नियोजन कोलमडले आहे. या दुरुस्ती कामामुळे शुक्रवार, ३ एप्रिल आणि शनिवार, ४ एप्रिल रोजी बार्देशमधील बहुतांश भागात मर्यादित पाणी पुरवठा होणार असल्याचे पेयजल पुरवठा खात्याने स्पष्ट केले आहे.गुरुवारी, २ एप्रिल रोजी सकाळी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून येणाऱ्या मुख्य वाहिनीला तिळारी कालव्याच्या क्रॉसिंगजवळ पहिली गळती दिसून आली. खात्याने तातडीने कंत्राटदाराच्या मदतीने जेसीबीद्वारे दुरुस्ती सुरू केली. मात्र, सायंकाळी काम सुरू असतानाच काही अंतरावर दुसरी गळती असल्याचे अभियंत्यांच्या निदर्शनास आले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही ठिकाणच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
पेयजल पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन खात्यामार्फत करण्यात आले आहे.
म्हापशासह अनेक गावांत पाणी टंचाई
जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे बार्देश तालुक्यातील संपूर्ण म्हापसा मतदारसंघ, कळंगुट, कांदोळी, गिरी, नेरूल, रेईश मागुश, साळगाव, रेवोडा, नादोडा, थिवी, कामुर्ली, कोलवाळ, मार्ना-शिवोली, सडये, ओशेल, मयडे, बस्तोडा, भुतकीवाडा, आराडी, वाडे, खर्रे या भागांत हा मर्यादित पाणी पुरवठा असेल.