पीएनजी जोडणी घेणाऱ्या आस्थापनांना मिळणार सिलिंडरचा वाढीव कोटा

नागरी पुरवठा खात्याची माहिती

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
57 mins ago
पीएनजी जोडणी घेणाऱ्या आस्थापनांना मिळणार सिलिंडरचा वाढीव कोटा

पणजीः  नागरी पुरवठा खात्याने व्यावसायिक सिलिंडरसाठी अतिरिक्त २० टक्के वाढीव कोटा जाहीर केला होता.  पण दुसऱ्या दिवशी खात्याने एक सूचना जारी करून अतिरिक्त कोट्याचा लाभ घेण्यासाठी ‘पायप्ड नॅचरल गॅस’ (पीएनजी)  (PNG) जोडणी घेणे आस्थापनांना सक्तीचे केले आहे. 

पण पीएनजी सुविधा नसलेल्या परिसरातील आस्थापनांनी भविष्यात पीएनजी घेण्याचे हमीपत्र दिल्यास ते कोट्यासाठी पात्र ठरणार, असे नागरी पुरवठा खात्याच्या (Civil supply department) अधिकाऱ्याने सांगितले. 

बुधवारी नागरी पुरवठा खात्याने व्यावसायिक सिल‌िंडरांच्या (Commercial cylinder)  कोट्यात ६० टक्के वाढ करण्याचा आदेश दिला होता. यातील २० टक्के कोटा उद्योगीक क्षेत्रासाठी तर ४० टक्के कोटा हा आदरात‌िथ्य आस्थापनांसाठी वाटून दिला होता. यापूर्वी उद्योग क्षेत्राला व्यावसायिक सिलिंडराचा पुरवठा बंद होता. आणि आदरात‌िथ्य क्षेत्राला केवळ २० टक्के कोटा मर्यादीत होता. 

त्यानंतर खात्याने नवी सूचना जारी करून सांगितले की, सध्याची इंधन टंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सवांत यांनी मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारने तत्काळ २० टक्के वाढीव कोट्याची घोषणा केली. पण राज्यातील व्यावसायिक आस्थापनांनी जर पीएनजी जोडणी घेतली तरच त्यांना ४० टक्के पर्यंत अतिरिक्त गॅस स‌िलिंडर एलपीजी कोटा मिळणार. याचा लाभ हॉटेल्स, खानावळी, बेकरी, कॅन्टीन, इस्पीतळे, हॉस्टेल, अन्न प्रक्रिया युनिट्स आणि सामुदायीक स्वयंपाकगृहांना मिळणार. 

यात सरकारने एक सूट जाहीर केली आहे. हा वाढीव कोटा घेण्यासाठी व्यावसायिकांना सक्रीय पीएनजी जोडणी किंवा अस्तित्वात असलेली पाईपलाईनीची सुविधा आवश्यक नाही. एकदा पीएनजीचे जाळे तयार झाल्यानंतर पीएनजी सुविधेकडे वळण्यास आम्ही तयार आहोत, असे हमीपत्र अर्जासहीत सादर केल्यानंतर ही आस्थापने पात्र ठरू शकतात,  असे अधिकाऱ्याने सांगितले. 

हा निर्णय व्यावसायिकांना लवकरात लवकर आधार देण्यासाठी आणि त्यांना हळूहळू पीएनजीकडे वळवण्यासाठी घेतला आहे. व्यावसायिकांनी पीएनजी जोडणीसाठी अर्ज करताना आपल्या व्यवसायाची माहिती ती म्हणजे जीएसटी नोंदणी आणि लागत असलेल्या गॅसचा अंदाज सादर करावा. त्यानंतर त्यांच्या रोलाउट प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांच्या जागेची तपासणी होणार, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

उत्तर गोव्यासाठी, ‘गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट ‌लिमिटेड’कडे अर्ज करावा. दक्षिण गोव्याच्या आस्थापनांनी ‘इंडिय ऑईल–अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेड'  यांच्याकडे अर्ज करावा. हा वाढीव कोटा मर्यादीत काळासाठी असल्याने, सरकारने व्यावसायिक एलपीजीचा वापर करणाऱ्या सर्वांनी लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. 



हेही वाचा