
मडगाव : दक्षिण गोव्यातील बेताळभाटी समुद्र किनार्यावर दोन अल्पवयीन मुले पालकांशिवाय असल्याचे पर्यटन पोलिसांना आढळून आले. पर्यटन पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करत पालकांशी संपर्क साधला. मुलांना कोलवा पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर पालकांकडे त्या मुलांचा ताबा देण्यात आला.
बेताळभाटी किनार्यावर पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलांची पुन्हा पालकांशी भेट घडवून आणण्यात पर्यटन पोलिसांची भूमिका महत्त्वाची राहिली. किनार्यावर पालकांपासून दुरावलेल्या दोन अल्पवयीन मुलांची पर्यटन पोलिसांनी सुखरूप सुटका करून त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. ही मुले इस्लामपूर महाराष्ट्र येथील असून कोलवा पोलीस स्थानकात त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. दि. १ एप्रिल रोजी पर्यटन पोलीस युनिटचे कर्मचारी बेताळभाटी किनार्यावर गस्त घालत असताना, त्यांना दोन अल्पवयीन मुले कोणत्याही पालकाशिवाय एकटीच फिरताना आढळली. पोलिसांनी तातडीने मुलांशी संवाद साधून त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशीनंतर पोलिसांनी मुलांच्या पालकांशी संपर्क साधला आणि त्यांना कोलवा पोलीस स्थानकात बोलावून घेतले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, या दोन्ही मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप सोपवण्यात आले. मुलांच्या पालकांनी पर्यटन पोलिसांचे आभार मानले.