'चेक्ड बाय दोतोर' मोहिमेमुळे गोव्यातील ३७ हजारांहून अधिक महिलांना लाभ

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
27 mins ago
'चेक्ड बाय दोतोर' मोहिमेमुळे गोव्यातील ३७ हजारांहून अधिक महिलांना लाभ

पणजी : गोवा सरकारने सुरू केलेल्या 'चेक्ड बाय दोतोर' या मोहिमेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत ८ ते ३१ मार्च दरम्यान ३७,२९५ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये महिलांची ११ विविध प्रकारच्या आजारांसाठी चाचणी करण्यात आली, तर काही महिलांना आवश्यक औषधे आणि लस देण्यात आली. राज्य सरकारने जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी ही मोहीम सुरू केली होती. यामध्ये ४० वर्षांवरील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या मोहिमेत उच्च रक्तदाबासाठी २७,०२३ महिलांची चाचणी करण्यात आली. मधुमेहासाठी २३,०३६, स्तनांच्या कर्करोगासाठी ११,३४७, तोंडाच्या कर्करोगासाठी १२,७९३, अ‍ॅनिमियासाठी १२,५६३ तर मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी (युरिन इन्फेक्शन) ५,९४३ महिलांची तपासणी करण्यात आली. याशिवाय ३७९ महिलांना 'टीडी' लस, तर १२० मुलींना 'एचपीव्ही' लस देण्यात आली. २,४०९ महिलांना रक्तातील लोह वाढवण्यासाठीच्या गोळ्या, तर २,४९४ महिलांना कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत.

मोहिमेदरम्यान १,३९६ महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. ६,१२९ महिलांचे कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन करण्यात आले. ३,११० गरोदर महिलांची, तर ५६९ बाळंतीण महिलांची तपासणी करण्यात आली आहे. ९,६६३ महिलांनी आयुष ओपीडी सेवांचा लाभ घेतला. १,०९१ महिलांची 'पीएपी' (PAP) चाचणी झाली, तर १३,२४० महिलांचे विविध विषयांवर समुपदेशन करण्यात आले. या मोहिमेत दोन्ही जिल्हा रुग्णालये, प्राथमिक व सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि गोमेकॉमध्ये मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध होती.

या मोहिमेत काही खासगी रुग्णालयांचाही समावेश करण्यात आला होता. या रुग्णालयांमध्ये सवलतीच्या दरात तपासण्या करण्यात आल्या. यासाठी प्रत्येक तालुक्यातील एका खासगी रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. महिला अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात; त्यांनी वेळेत तपासणी करून भविष्यातील आजार टाळावेत, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली होती.

२,१४२ महिला अ‍ॅनिमिक

या कालावधीत राज्यातील २,१४२ महिलांना अ‍ॅनिमिया (रक्तक्षय) असल्याचे आढळून आले आहे. तसेच १,२४५ महिलांचे नमुने क्षयरोगाच्या (टीबी) अत्याधुनिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


हेही वाचा