बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवले अनेक पासपोर्ट; गोव्यात विदेशी नागरिकाला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
21 mins ago
बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवले अनेक पासपोर्ट; गोव्यात विदेशी नागरिकाला अटक

पणजी : बनावट कागदपत्रे व पासपोर्ट (Passport)  वापरून गोव्यात (Goa), भारतात (India) वास्तव्य करून राहिल्याप्रकरणी गोव्यातील गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका विदेशी नागरिकाला अटक केली.  या प्रकरणी रायबंदर येथील क्राइम ब्रँच (Crime Branch) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कारवाई करण्यात आली. 

तक्रारदार पोलीस निरीक्षक (Police inspector)  महेश गडेकर यांच्या फिर्यादीनुसार, संशयित बुडा ओझोलिन्स (वय ५२, मूळ रहिवासी लाटविया) याने पूर्वी हरमल, पेडणे येथील माढळावाडा परिसरातील ओशॅनिक व्हिला येथे राहून गुन्हेगारी कृत्य केले. संशयिताने बनावट कागदपत्रे सादर करून अधिकाऱ्यांची फसवणूक केली आणि वेगवेगळ्या नावांनी अनेक पासपोर्ट मिळवले.

तपासात असेही उघड झाले की, संशयिताने आपली खरी ओळख लपवून वेगवेगळ्या नावांनी प्रवास केला. तसेच गोवा, भारतात वास्तव्य केले. या प्रकारामुळे भारतीय अधिकाऱ्यांची दिशाभूल झाली असून, कोणतेही वैध कारण नसताना फसवणूक करण्यात आली आहे.

या प्रकरणी मांद्रे पोलीस ठाण्यात (Mandrem Police Station)  गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३१८ ३१८(४) तसेच इमिग्रेशन आणि फॉरेनर्स अॅक्ट २०२५ च्या कलम २२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर संशयिताला अटक करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिषेक चोडणकर करीत आहेत.

हेही वाचा