समाजप्रबोधनाची माळ जपणारे कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकरांचे ट्रकच्या धडकेत निधन

अंधश्रद्धा निर्मूलनाचा वारसा धोक्यात; भोंदूबाबाच्या समर्थकांकडून पोलिसांसोबत थेट राडा अन् दादागिरी. नांदेड येथील घटना.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
33 mins ago
समाजप्रबोधनाची माळ जपणारे कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकरांचे ट्रकच्या धडकेत निधन

नांदेड: कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार करणारे आणि विठ्ठल नामाच्या गजरात प्रबोधनाची ज्योत पेटवणारे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी नांदेड शहरातील सिडको परिसरातील रुबी हॉटेलजवळ एका भरधाव हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला चिरडले. समाजप्रबोधनाचे व्रत आयुष्यभर जपणाऱ्या एका समर्पित वारकरी नेत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. नियतीने घातलेला हा घाला वारकरी संप्रदायासाठी आणि सामाजिक चळवळीसाठी कधीही भरून न निघणारी मोठी हानी ठरली आहे.

कंधार तालुक्यातील बारूळ गावचे सुपुत्र असलेले मधुकर महाराज केवळ एक कीर्तनकार नव्हते, तर ते मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. समाजाला व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी आयुष्यभर झोकून देऊन काम केले. मंगळवारी सिडको परिसरात आयोजित वारकरी परिषदेच्या एका महत्त्वाच्या बैठकीसाठी ते आले होते. ही बैठक आटोपून आपल्या गावी, बारूळकडे परतत असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास काळाने त्यांच्यावर झडप घातली. पाठीमागून आलेल्या एका अनियंत्रित हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि महाराज ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच प्राणज्योत मालवली.

या घटनेची माहिती मिळताच सिडको परिसरात मोठी गर्दी जमली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, मात्र लग्नकार्यामुळे असलेल्या गर्दीचा फायदा घेत ट्रकचालक फरार झाला. दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनाच्या कारभारावर आणि शहरातील जड वाहतुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नांदेड शहरात जड वाहतुकीवर बंदी असतानाही, विशेषतः सिडको-हडको भागात रेती वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकची वर्दळ दिवसभर सुरू असते. यापूर्वीही याच भागात अनेक निष्पाप नागरिकांचा या ट्रकमुळे बळी गेला आहे. 'समाज सुधारण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या महाराजांचा बळी अशा बेजबाबदार वाहतुकीमुळे जावा, हे दुर्दैव आहे,' अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

दुसरीकडे, नांदेड जिल्ह्यात 'तलवार बाबा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोंदूगिरी करणाऱ्या ज्ञानेश्वर करडे याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याच्या अटकेनंतर बिलोली पोलीस ठाण्यात त्याच्या समर्थकांनी जो राडा केला, तो कायदा-सुव्यवस्थेच्या चिंतेत भर टाकणारा आहे. भोंदू बाबाच्या समर्थकांनी चक्क पोलिसांना धमक्या देऊन गुन्ह्याची कागदपत्रे फाडून टाकली. अंधश्रद्धेविरुद्ध समाजासाठी लढणारे मधुकर महाराज एकीकडे जगाचा निरोप घेत असतानाच, दुसरीकडे अशा भोंदूगिरीचे समर्थन करणारा समाजच पोलिसांना आव्हान देत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बाबाच्या दोन समर्थकांना अटक केली असून, अशा प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी आता जोर धरत आहे.

हेही वाचा