इराणचा कुवेत विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाक्यांना भीषण आग

जीवितहानी नाही

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
01st April, 01:42 pm
इराणचा कुवेत विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाक्यांना भीषण आग

कुवेत : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर कुवेतमध्ये मोठी घटना घडली आहे. इराणकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Kuwait International Airport)  इंधन टाक्यांना भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कुवेतच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी हा हल्ला झाला. या हल्ल्यात ‘कुवेत एव्हिएशन फ्युएलिंग कंपनी’च्या (Kuwait Aviation Fuelling Company) इंधन साठवण टाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या प्रवक्त्याने या घटनेची पुष्टी केली आहे.

या स्फोटानंतर विमानतळ परिसरात मोठी आग लागली असून, अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. सुरक्षेच्या दृष्टीने काही उड्डाणांवर तात्पुरते निर्बंध लावण्यात आले आहेत.

दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गल्फ देशांवर हल्ल्यांची मालिका सुरू असल्याचे दिसत आहे. विशेषतः अमेरिकन लष्करी तळ असलेल्या देशांना लक्ष्य केले जात असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

या घटनेमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणा सतर्क असून; पुढील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा