खाण्यात बेकिंग सोडा मिसळून आजारी पाडण्याचा धक्कादायक प्रकार; १८८ कोटींचा विमा घोटाळा उघड

काठमांडू: जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या कुशीत पर्यटकांच्या जिवाशी खेळणारा एक अत्यंत भयानक घोटाळा उघडकीस आला आहे. पर्यटकांना जाणीवपूर्वक आजारी पाडून, त्यांचे बनावट हेलिकॉप्टर रेस्क्यू दाखवून आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये उकळण्याचे मोठे रॅकेट नेपाळ पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. 'काठमांडू पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, या 'एव्हरेस्ट स्कँडल'मध्ये काही स्थानिक शेरपा, ट्रेकिंग कंपन्यांचे मालक, हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि रुग्णालयातील डॉक्टरांचा समावेश असून, या सर्वांनी मिळून सुमारे १८८ कोटी रुपयांचा विमा घोटाळा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या घोटाळ्याची कार्यपद्धती अत्यंत अमानवीय आहे. तपासात असे समोर आले आहे की, काही शेरपा आणि ट्रेकिंग एजन्सीज पर्यटकांच्या खाण्यापिण्यात 'बेकिंग सोडा' किंवा काही विशिष्ट औषधे मिसळत असत. यामुळे पर्यटकांना तीव्र पोटदुखी, उलट्या आणि जुलाब होत असत. उंचीवरील हवेचा दाब आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या 'अल्टीट्यूड सिकनेस'सारखीच ही लक्षणे दिसत असल्याने पर्यटक घाबरून जात. काही वेळा 'डायमॉक्स' सारखी औषधे आणि प्रमाणाबाहेर पाणी पाजून पर्यटकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे भासवले जाई. एकदा का पर्यटक आजारी पडला की, त्याला तातडीने काठमांडूमध्ये हलवण्यासाठी महागड्या हेलिकॉप्टर रेस्क्यूचा आग्रह धरला जात असे.
खऱ्या अर्थाने हा खेळ विमा वसुलीचा होता. रेस्क्यूसाठी एकाच हेलिकॉप्टरमध्ये अनेक पर्यटकांना बसवले जात असे, परंतु विमा कंपन्यांना पाठवताना प्रत्येक पर्यटकासाठी स्वतंत्र उड्डाण केल्याचे बनावट बिल पाठवले जाई. उदाहरणार्थ, ४ हजार डॉलरच्या उड्डाणाचे १२ हजार डॉलरचे क्लेम केले जात. यामध्ये रुग्णालयांचाही मोठा सहभाग होता. डॉक्टरांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून बनावट मेडिकल रिपोर्ट्स तयार केले जात. धक्कादायक बाब म्हणजे, काही प्रकरणांत पर्यटकांना रुग्णालयात भरती दाखवले असताना, प्रत्यक्षात ते पर्यटक रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये बसून बीअर पीत असल्याचेही तपासात आढळले आहे. डोंगरदऱ्यांतील दुर्गम भागातील या घटनांची सत्यता पडताळणे आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांसाठी अशक्य असल्याने या टोळीचे फावले होते.
नेपाळ पोलिसांनी याप्रकरणी ३२ जणांवर गुन्हे दाखल केले असून ३ मोठ्या रेस्क्यू कंपन्यांच्या ६ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हा घोटाळा पहिल्यांदा २०१८ मध्ये समोर आला होता, मात्र कठोर कारवाईअभावी त्याचे स्वरूप अधिक विस्तारले. या घोटाळ्यामुळे नेपाळच्या पर्यटन क्षेत्राची जागतिक प्रतिमा डागाळली असून अनेक आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी नेपाळमध्ये येणाऱ्या ट्रेकर्सना विमा कवच देणे बंद केले आहे. नेपाळच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या पर्यटन व्यवसायावर या 'रेस्क्यू स्कॅम'मुळे गंभीर सावट निर्माण झाले आहे.