१२ वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी आईसह तिघांना बेड्या; झारखंडमध्ये अघोरी प्रथांचे संकट.

रांची : विज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचे मूळ किती खोलवर रुजलेले आहे, याचा एक अत्यंत अंगावर काटा आणणारा प्रकार झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात उघडकीस आला आहे. आपल्या आजारी मुलाला बरे करण्यासाठी एका मातेने चक्क मांत्रिकाच्या सांगण्यावरून स्वतःच्या १२ वर्षीय निष्पाप मुलीचा बळी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलीची आई, तिचा प्रियकर आणि एका महिला मांत्रिकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हजारीबाग येथील ३५ वर्षीय रेशमी देवी हिचा मुलगा गेल्या काही काळापासून शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त होता. अनेक उपचार करूनही मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रेशमी देवी शांती देवी नावाच्या एका महिला मांत्रिकाच्या संपर्कात आली. अंधश्रद्धेचा फायदा घेत या मांत्रिकाने रेशमीला सांगितले की, तुझ्या मुलावर देवीचा कोप आहे. जर मुलाला पूर्णपणे सुरक्षित आणि बरे करायचे असेल, तर एका 'कुमारी' मुलीचा बळी देणे हाच एकमेव मार्ग आहे. मुलाच्या मायेपोटी अंधश्रद्धेत बुडालेल्या या मातेने पोटच्या मुलीचा जीव घेण्याचे पातक केले.
२४ मार्च रोजी अष्टमीच्या रात्री हा अमानुष प्रकार घडला. हजारीबागचे पोलीस अधीक्षक अंजनी अंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशमी देवीने स्वतःच्या मुलीचे पाय धरले, तर तिचा प्रियकर भीम राम याने मुलीचा गळा दाबून तिचा खून केला. या क्रूर कृत्यानंतर मांत्रिकाने विधी करण्यासाठी मृत शरीरावर जखमा केल्या आणि डोक्यावर प्रहार करून रक्त मिळवल्याचे तपासात समोर आले आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मुलीचा मृतदेह एका बागेत पुरून टाकला. विशेष म्हणजे, भीम राम याच्यावर यापूर्वीही हत्येचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडल्यानंतर आरोपींनी सुरुवातीला हा बलात्कार आणि हत्येचा प्रकार असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालात बलात्काराचा कोणताही पुरावा आढळला नाही. संशय बळावल्याने पोलिसांनी रेशमी देवीची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. तंत्र-मंत्र आणि नरबळीच्या या भीषण प्रकारामुळे झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच सामाजिक प्रबोधनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.