भारतीय लिलाव इतिहासात नवा विक्रम : सायरस पुनावाला यांनी लावली विक्रमी बोली

मुंबई : भारतीय चित्रकलेच्या इतिहासात बुधवारी सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली आहे. जगप्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या ऑईल पेंटिंगचा मुंबईत झालेल्या लिलावात तब्बल १६७.२ कोटी रुपयांना विक्रमी लिलाव झाला. सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी ही ऐतिहासिक खरेदी करून भारतीय कलाविश्वात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
मुंबईत पार पडलेल्या 'सॅफरॉनआर्टस स्प्रिंग लाईव्ह ऑक्शन'मध्ये या चित्रासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. या पेंटिंगची मूळ किंमत ८० ते १२० कोटी रुपयांच्या दरम्यान अपेक्षित होती. मात्र, लिलावाच्या शेवटी ही बोली थेट १६७.२ कोटींवर जाऊन थांबली. यापूर्वी भारतात एम. एफ. हुसेन यांच्या 'अनटायटल्ड (ग्रामयात्रा)' या चित्राची ११८ कोटी रुपयांना झालेली विक्री हा सर्वोच्च विक्रम होता.
‘राष्ट्रीय खजिना’ जनतेसाठी होणार खुला
या ऐतिहासिक खरेदीनंतर सायरस पुनावाला यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, हे पेंटिंग खरेदी करणे हे माझे कर्तव्य आणि सन्मान आहे. हा एक राष्ट्रीय खजिना असून, पुढील १५ दिवसांत हे चित्र सामान्य जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.
१८९० मधील कलाकृतीचे वैशिष्ट्य
- राजा रवि वर्मा यांनी १८९० मध्ये या अजरामर चित्राची निर्मिती केली होती.
- या चित्रात माता यशोदा गाईचे दूध काढताना दिसत असून, बालकृष्ण त्यांच्या बाजूला उभे असल्याचे अत्यंत मोहक दृश्य रेखाटण्यात आले आहे.
- हे चित्र राजा रवि वर्मा यांच्या कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वाच्या कामांपैकी एक मानले जाते, ज्यामध्ये भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य ऑईल पेंटिंग तंत्राचा सुरेख संगम पाहायला मिळतो.