
नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-अमेरिका (Iran-US) संघर्षादरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव अधिकच वाढला असून, या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाम भूमिका मांडली आहे. “गल्फमधील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये केवळ भारतालाच आपल्या खलाशांचे प्राण गमवावे लागले,” असे स्पष्ट करत भारताने सामुद्रधुनी तातडीने खुली करण्याची मागणी केली आहे.
यूकेने (UK) आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारताची भूमिका मांडताना आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधील मुक्त आणि सुरक्षित नौकावाहतुकीचे महत्त्व अधोरेखित केले. सुमारे ६० हून अधिक देश या बैठकीत सहभागी झाले होते.
ऊर्जा सुरक्षेवर मोठा परिणाम
भारताने (India)या संघर्षामुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले. होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) ही जगातील अत्यंत महत्त्वाची तेल वाहतूक मार्गिका असल्याने तिच्या बंदीमुळे जागतिक पुरवठा साखळीवर दबाव वाढला आहे.
भारतीय खलाशांचे बळी
या संघर्षाच्या सुरूवातीच्या काळात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांत ८ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात ३ खलाशी होते. या घटनेमुळे भारताने सुरक्षा आणि नौकावाहतुकीच्या स्वातंत्र्याचा मुद्दा अधिक ठामपणे मांडला आहे.
संवाद आणि शांततेवर भर
मिस्री यांनी परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तणाव कमी करणे आणि सर्व संबंधित देशांनी संवाद व राजनैतिक चर्चेचा मार्ग स्वीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले.
दरम्यान, ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री यवेट कूपर यांनीही ही बैठक लष्करी कारवाई पेक्षा राजनैतिक उपायांवर लक्ष केंद्रीत करणारी असल्याचे सांगितले.
मुक्त व्यापार नौकावाहतुकीला भारताचा पाठिंबा
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जैस्वाल यांनी सांगितले की, “आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत सुरक्षित आणि मुक्त व्यापार नौकावाहतुकीला भारताचा पाठिंबा कायम आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे.”
सामुद्रधुनीच्या सुरक्षेची जबाबदारी इतर देशांनी घ्यावी : ट्रम्प
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी या सामुद्रधुनीच्या सुरक्षेची जबाबदारी इतर देशांनी घ्यावी असे सूचित केले. त्यांनी इंधन टंचाईचा सामना करणाऱ्या देशांना अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याचा सल्ला देत, संघर्ष संपल्यानंतर ही सामुद्रधुनी “स्वाभाविकपणे खुली होईल” असेही म्हटले.
होर्मुझ सामुद्रधुनीसाठी एकत्र या : भारत
होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठे संकट निर्माण झाले असून, भारताने या प्रश्नावर ठाम भूमिका घेत आंतरराष्ट्रीय समुदायाला शांतता, संवाद आणि सुरक्षित नौकावाहतुकीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.