लोकांच्या आरोग्याशी खेळ नको! दूषित पाण्याच्या प्रश्नावर आरोग्य सचिव आक्रमक

प्रभू व्हायोलेटातील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट; येत्या सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांशी होणार चर्चा.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
लोकांच्या आरोग्याशी खेळ नको! दूषित पाण्याच्या प्रश्नावर आरोग्य सचिव आक्रमक

पणजी: गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठ्याच्या गंभीर समस्येचा सामना करणाऱ्या 'प्रभू व्हायोलेटा' या दाबोळी  येथील रहिवाशांनी आज थेट आरोग्य सचिवांची भेट घेऊन आपला संताप व्यक्त केला. वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्राधिकरणांकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रहिवासी आता हताश झाले आहेत. 

रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी यापूर्वी पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मात्र, अद्यापही या दूषित पाण्याच्या समस्येवर कोणताही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती रहिवाशांनी आरोग्य सचिवांसमोर व्यक्त केली.



आजच्या या भेटी दरम्यान आरोग्य सचिवांसोबत सविस्तर आणि फलदायी चर्चा झाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य सचिवांनी येत्या सोमवारी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्व संबंधित प्राधिकरणांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

प्रभू व्हायोलेटा इमारतीच्या रहिवाशांनी प्रशासनाच्या या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले असले, तरी सोमवारी होणाऱ्या बैठकीतून प्रत्यक्ष कृती आणि स्वच्छ पाण्याचे आश्वासन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जर या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही, तर पुढील पाऊल उचलण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.


हेही वाचा