आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवला ५९वा क्रमांक

पणजी : गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली असून विमानतळ सेवा गुणवत्तेसाठी (ASQ) दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) पुरस्कारांमध्ये दाबोळी विमानतळाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) सर्व विमानतळांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच, जागतिक क्रमवारीत ५९ वे स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हे प्रतिष्ठित मानांकन पूर्णपणे प्रवाशांच्या प्रत्यक्ष अभिप्रायांवर (Feedback) आधारित असून, त्यामध्ये विमानतळावरील सेवांची उपलब्धता, कर्मचाऱ्यांचे सौजन्य, स्वच्छता आणि प्रवाशांचा एकूण विमानतळ अनुभव यांसारख्या विविध निकषांचा विचार केला जातो. विमान वाहतूक उद्योगात हा पुरस्कार अत्यंत मानाचा समजला जातो. दाबोळी विमानतळाने केवळ राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर जागतिक स्तरावरील अनेक नामांकित विमानतळांना मागे टाकत हे यश संपादन केले आहे.
विमानतळ संचालक फ्लाइट लेफ्टनंट आकाश दीप यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय विमानतळाची टीम, एअरलाईन भागीदार आणि सर्व संबंधित स्टेकहोल्डर्स यांच्या सामूहिक प्रयत्नांना दिले आहे. सर्वांच्या परस्पर समन्वयामुळे आणि प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याच्या जिद्दीमुळेच हे ध्येय गाठणे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले. प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी विमानतळ प्रशासन सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
![]()
भविष्यातील ध्येयाबद्दल बोलताना आकाश दीप यांनी स्पष्ट केले की, हे यश केवळ सुरुवात आहे. आगामी वर्षात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावण्याचे आमचे लक्ष्य असून, त्यासाठी डिजिटल सुविधांचे सक्षमीकरण आणि सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यावर भर दिला जाईल. या पुरस्कारामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळणार असून, आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढण्यासही मदत होणार आहे.