बाधितांच्या संख्येत किंचित वाढ : आधुनिक उपचारामुळे मृत्यूच्या प्रमाणात ८० टक्के घट

पणजी : गोव्यात मागील पाच वर्षांत (२०२१-२०२५) एचआयव्ही बाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली असून एकूण १२८४ जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्याला दरमहा सरासरी २१ नवीन रुग्ण मिळत असले, तरी अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. २०१० च्या तुलनेत २०२५ मध्ये मृत्यूचे प्रमाण ८० टक्क्यांनी घटले असून, गरोदर महिलांमधील संसर्गाचे प्रमाणही नियंत्रणात असल्याची समाधानकारक माहिती मिळाली आहे.
राज्यात एचआयव्ही चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने बाधितांची आकडेवारी समोर येण्यास मदत होत आहे. २०२१ मध्ये ९३,३१२ चाचण्या झाल्या होत्या, तर २०२५ मध्ये ही संख्या १.५२ लाखांपर्यंत पोहोचली आहे. या वाढत्या चाचण्यांमुळे बाधितांच्या संख्येत पाच वर्षांत सुमारे १६ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. विशेष म्हणजे, गरोदर महिलांमध्ये होणाऱ्या एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमी होत असून, २०२४ मध्ये केवळ ५ आणि २०२५ मध्ये ८ गरोदर महिलांना याची बाधा झाल्याचे आढळले आहे.
| वर्ष | एकूण चाचण्या | आढळलेले रुग्ण | गरोदर महिला (बाधित) |
|---|---|---|---|
| २०२१ | ९३,३१२ | २३४ | ११ |
| २०२२ | १.१९ लाख | २५७ | १५ |
| २०२३ | १.४९ लाख | २७२ | १० |
| २०२४ | १.५३ लाख | २५१ | ०५ |
| २०२५ | १.५२ लाख | २७० | ०८ |
मृत्यूदराबाबत माहिती देताना समोर आले आहे की, मागील पाच वर्षांत एड्समुळे एकूण १४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ मध्ये सर्वाधिक ३८ मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, जागतिक दर्जाची आधुनिक औषधे आणि वेळेवर मिळणाऱ्या उपचारामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या नियंत्रित करण्यात यश आले आहे. सध्या राज्यात एड्सबाधितांसाठी मोफत आरोग्य सेवा आणि जनजागृतीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे.