महिला साक्षरता दरात गोवा देशात सहाव्या स्थानी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महिला साक्षरता दरात गोवा देशात सहाव्या स्थानी आहे. केंद्रीय सांख्यिकी खात्याने २०२५ मध्ये केलेल्या कार्यशक्ती सर्व्हेक्षणानुसार गोव्यातील ८८.६ टक्के महिला साक्षर आहेत. या दरम्यान महिला साक्षरतेची राष्ट्रीय सरासरी ७४.९ टक्के इतकी होती. या क्रमवारीत मिझोरममधील महिला प्रथमस्थानी आहेत. तेथील ९९.८ टक्के महिला साक्षर आहेत. यानंतर केरळ (९४.४ टक्के), नागालँड (९२.६ टक्के), मेघालय (९२.१ टक्के), मणिपूर (८८.८ टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो. यासाठी खात्याने देशभरातील १.४८ लाख कुटुंबांतील ३.५ लाखांहून अधिक महिलांचे सर्वेक्षण केले होते.
सर्वेक्षण अहवालानुसार, २०२५ मध्ये देशात राजस्थानमधील महिला साक्षरता दर सर्वांत कमी म्हणजे ६३.७ टक्के आहे. यानंतर बिहार (६६.१ टक्के), आंध्र प्रदेश (६५.५ टक्के), तेलंगणा (६७.६ टक्के), उत्तर प्रदेश (६९.३ टक्के), मध्यप्रदेश (६९.८ टक्के), झारखंड (७३.१ टक्के), छत्तीसगढ (७४.१ टक्के), ओडिशा (७५.१ टक्के) ही राज्ये आहेत. केंद्र शासित प्रदेशात पुद्दुचेरीमध्ये सर्वाधिक ९१.५ टक्के महिला साक्षर आहेत, तर जम्मू आणि काश्मीरमधील महिला साक्षरतेचे प्रमाण ७१.७ टक्के इतके आहे.
देशभरात साक्षरता तसेच महिला साक्षरता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नवभारत साक्षरता कार्यक्रम (उल्लास) ही योजना राबवली आहे. ही योजना राष्ट्रीय शिक्षण धोरणासोबत संलग्न आहे. यामध्ये शाळेमध्ये जाऊ न शकणाऱ्या १५ वर्षांवरील व्यक्तींना शिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये मूलभूत साक्षरता, मूलभूत शिक्षण, कौशल्य व अन्य व्होकेशनल कौशल्य शिकवले जातात. योजनेअंतर्गत गोव्याला यापूर्वीच १०० टक्के साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.
साक्षरतेत वाढ
२०११ च्या जनगणनेनुसार गोव्यातील महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०११ मध्ये गोव्यातील ८१.८४ टक्के महिला साक्षर होत्या. २०२५ मध्ये ही संख्या वाढून ८८.६ टक्के झाली आहे.