उद्यापासून बार्देश तालुक्याचा पाणी पुरवठा होणार पूर्ववत

म्हापसा : कोलवाळ येथे तिळारी कालव्याजवळ गळती लागलेल्या १००० मिमी क्षमतेच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पेयजल पुरवठा खात्याने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या जलवाहिनीला एकूण चार ठिकाणी गळती लागली होती. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पार पडल्यामुळे रविवारपासून बार्देश तालुक्यातील पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे.
३१ मार्च रोजी नियमित तपासणीदरम्यान जलवाहिनीतील गळती प्रथम निदर्शनास आली होती. त्यानंतर १ एप्रिल रोजी गळतीचे प्रमाण वाढू लागले. ही जलवाहिनी बार्देश तालुक्यातील बहुतेक भागाला पाणीपुरवठा करत असल्याने, समस्या गंभीर होण्यापूर्वीच तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.
यानुसार २ एप्रिल रोजी मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तसेच, पेयजल पुरवठा खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी सार्वजनिक नोटीस जारी करून बार्देश तालुक्यातील नागरिकांना पाणीपुरवठा मर्यादित राहणार असल्याची माहिती दिली. ईस्टरच्या पार्श्वभूमीवर काम वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शुक्रवारी थिवी येथील वाल सोडून जलवाहिनी रिकामी करण्यात आली. त्यानंतर उत्खनन, परिसर स्वच्छता आणि खराब झालेल्या पाइपलाइनचा बदल अशा कामांना गती देण्यात आली. या दुरुस्तीसाठी जेसीबी व क्रेनसारख्या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. हे संपूर्ण काम खात्याचे मुख्य अभियंता विश्वंभर भेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता रश्मी शिरोडकर यांच्या देखरेखीखाली पार पडले. कनिष्ठ अभियंते रोहित नाईक आणि रोहिदास नाईक यांनी कामावर नियंत्रण ठेवले.
शुक्रवारी उशिरा रात्री दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, शनिवारी जलवाहिनीची चाचणी घेऊन टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर रविवारपासून पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल.
दुरुस्तीचे काम पूर्ण
आम्ही जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. शनिवारी चाचणीनंतर रविवारी पाणी पुरवठा सामान्य होईल. या दुरुस्तीच्या कामावर पेयजल पुरवठा मंत्री सुभाष फळदेसाई हे सतत लक्ष ठेवून होते. काम वेळेपूर्वी पूर्ण करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.