रोरो क्षमतेत वाढ : कोकण रेल्वेकडून पायाभूत सुविधा उभारणीसह सुरक्षित प्रवासावर भर

मडगाव : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने विकसित भारत संकल्पनेला अनुसरून प्रवासी सुविधा, तांत्रिक प्रगती आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली. तिकीट तपासणी मोहिमेतून २७.५९ कोटींचा महसूल प्राप्त केला. याशिवाय १४०० विशेष गाड्या चालवल्या. रोरोची क्षमता ५७ मेट्रीक टनपर्यंत वाढवण्यात आली तसेच प्लॅटफॉर्म सुधारणा, डिजीलॉकर व प्रवासी लॉऊंजची सोयही केली आहे.
कोकण रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधा व सुरक्षिततेसह नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे. कोकण रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणी मोहिमेतून २७.५९ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल गोळा केला आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन वर्षभरात एकूण १,४०० विशेष गाड्या चालवण्यात आल्या. यात गणेश उत्सव विशेष ३७६ फेर्या, उन्हाळी विशेष गाड्यांच्या १८५ फेर्या तर हिवाळी सुट्ट्यांसाठी ८६ फेर्यांचा समावेश आहे. याशिवाय रंजनगाव, अयोध्या व रामेश्वरम जोडणार्या देवदर्शन विशेष गाड्यांचा समावेश आहे. अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही कोकण रेल्वे अग्रेसर आहे. उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कोकण रेल्वेने योगदान दिले आहे.
रेल्वे रुळांच्या देखरेखीसाठी ड्रोनचा वापर
कोकण रेल्वे मार्गावरील रो-रो सेवेची क्षमता यावर्षी ५० मेट्रिक टनावरून ५७ मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यात आली. मालवाहतूक यामुळे अधिक कार्यक्षम झाली आहे. रेल्वे रुळांच्या देखभालीसाठी आणि देखरेखीसाठी प्रथमच ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यामुळे मानवी श्रम वाचून दुरुस्तीचा वेळ कमी झाला. मडगाव स्थानकावर लोको रिव्हर्सलसाठी रोड-६ लाइनचा विस्तार करण्यात आला.
प्रवासी सुविधा, स्थानक विकासावर भर
कोकण रेल्वे मार्गावरील खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, थिवी, करमळी, मडगाव, कारवार, मुरडेश्वर आणि उडुपी या १० स्थानकांवर वातानुकूलित लाउंज सुरू करण्यात आले. करमळी, थिवी, कारवार आणि उडुपी स्थानकांवर रॅम्प, ब्रेल लिपीतील फलक आणि अद्ययावत मार्गदर्शक बोर्ड लावण्यात आले असून दिव्यांगस्नेही सुविधा उभारणी केली. रत्नागिरी, थिवी आणि उडुपी येथे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी डिजी लॉकर सुविधा उपलब्ध केली. वैभववाडी स्थानकावर पादचारी पूल, तर कुमटा आणि गोकर्ण येथे उच्च क्षमतेचे प्लॅटफॉर्म बांधण्यात आले आहेत. सुरतकल, उडुपी आणि मुल्की स्थानकांवर प्लॅटफॉर्म शेल्टरचे काम पूर्ण झाले आहे.
सौरउर्जेमुळे ४५ लाखांची बचत
कोकण रेल्वेने सौर उर्जेचा वापर करत वीज बचत करण्यावर भर दिला आहे. कोकण रेल्वेने ३.६७ लाख युनिट सौर ऊर्जेची निर्मिती केली. यामुळे सुमारे ४५.९४ लाख रुपयांची बचत झाली. रेल्वे मार्गावर जनावरे येऊ नयेत म्हणून रत्नागिरी आणि कारवार विभागात २,७०० मीटरचे कुंपण घालण्यात आले. चौकट
हरवलेल्या ९० मुलांची पालकांशी भेट
कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर ९० मुलांचा शोध घेत त्यांची सुटका करत त्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट घडवून आणण्याचे काम रेल्वे सुरक्षा दलाकडून करण्यात आले. कळंबणी बुद्रुक, कडवई, खारेपाटण रोड, आचिर्णे आणि मिरजन या पाच नवीन स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत, तर इतर ५ स्थानकांवरील यंत्रणा अद्ययावत करण्यात आली.