गोव्यात आज व उद्या पावसाची शक्यता

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
24 mins ago
गोव्यात आज व उद्या पावसाची शक्यता

पणजी : तामिळनाडू, कर्नाटक आणि मध्य कोकण दरम्यान तयार झालेला द्रोणीय पट्टा (टर्फ) व अन्य वातावरणीय बदलांमुळे राज्यात आज आणि उद्या (४ एप्रिल) पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या दोन दिवसांत दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण होते. कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम असल्याने उकाडा जाणवत होता.

शुक्रवारी पणजीत कमाल ३४.२ अंश, तर किमान २३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमध्ये कमाल तापमान ३४ अंश व किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंश, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात ५ ते ९ एप्रिल दरम्यान हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

मागील २४ तासांत राज्यात सरासरी १.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यादरम्यान साखळीत ६.२ मिमी, धारबांदोडात ४.२ मिमी, वाळपईमध्ये २.५ मिमी, सांगेमध्ये २.३ मिमी, तर जुने गोवा येथे १.१ मिमी पाऊस झाला. यापूर्वी खात्याने एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामान अंदाज जारी केला आहे. त्यानुसार या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा