सकाळीच राघव चड्ढा यांनी व्हिडिओ पोस्ट करत, 'माझा आवाज दाबला जातोय' अशी टीका केली होती.

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीचे 'पोस्टर बॉय' मानले जाणारे राज्यसभा खासदार राघव चड्ढा आणि पक्षनेतृत्वातील संघर्ष आता 'समोसा' आणि 'सॉफ्ट पीआर'पर्यंत येऊन पोहोचला आहे. चड्ढा यांची पक्षाच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी "मला शांत करण्यात आले" असा भावनिक राग आळवला होता. मात्र, याला उत्तर देताना 'आप'च्या दिग्गज नेत्यांनी चड्ढांची चांगलीच फिरकी घेतली आहे. ज्यावेळी देशाच्या ज्वलंत मुद्द्यांवर भाजपच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची गरज होती, तेव्हा राघवजी संसदेच्या कॅन्टीनमध्ये समोसे किती रुपयांना मिळतात आणि ते किती वेळात डिलिव्हर होतात, याचा हिशेब करण्यात मग्न होते, अशा शब्दांत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि सौरभ भारद्वाज यांनी चड्ढांवर मिश्किल पण बोचरी टीका केली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चड्ढांच्या तक्रारीचा समाचार घेताना संसदेतील त्यांच्या 'प्राधान्यक्रमावर' बोट ठेवले. मान म्हणाले की, संसदेत विरोधी पक्षांच्या वतीने वॉकआउट करायचे असेल किंवा गंभीर विषयांवर सरकारला धारेवर धरायचे असेल, तेव्हा चड्ढा ठरवून गायब असायचे. गुजरातमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली किंवा मतदारांची याद्यांमधून नावे कापली गेली, तेव्हा मौन बाळगणारे चड्ढा संसदेत मात्र 'कॅन्टीनमधील समोशांचा दर' कमी करण्यासाठी हिरिरीने पुढे असायचे. चड्ढांच्या या 'समोसा क्रांती'मुळे पक्ष कमालीचा नाराज असून, ते भाजपसमोर पूर्णपणे 'कॉम्प्रोमाईज' झाल्याचा संशयही मान यांनी बोलून दाखवला आहे.
दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी तर चड्ढांच्या 'घाबरट' स्वभावावर थेट निशाणा साधला. जो डर गया, समझो मर गया, असा टोला लगावत भारद्वाज यांनी आठवण करून दिली की, जेव्हा अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री असताना अटक झाली, तेव्हा चड्ढा देशात नव्हतेच; ते कुठेतरी जाऊन लपले होते. संसदेत भाजपविरोधातील अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार देणारे चड्ढा आता स्वतःला 'विक्टीम' म्हणवून घेत आहेत, हे मोठेच धाडस असल्याचे भारद्वाज मिश्किलपणे म्हणाले. चड्ढा सध्या जे 'सॉफ्ट पीआर' करत आहेत, त्याला भाजपचे सोशल मीडिया हँडल पाठिंबा देत असल्याचे पाहून चड्ढांचा नक्की प्रवास कुठे चालला आहे, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
संजय सिंह यांनीही या वादात उडी घेत चड्ढांना आरसा दाखवला आहे. अरविंद केजरीवाल यांचे खरे शिपाई निडरपणे लढतात, पण चड्ढांनी मात्र जनतेच्या प्रश्नांवर मौन पाळून केवळ स्वतःची प्रतिमा चमकवण्याकडे लक्ष दिले, असा आरोप सिंह यांनी केला. संसदेत जेव्हा संपूर्ण विरोधी पक्ष एकजुटीने सभात्याग करत असे, तेव्हा चड्ढा आपल्या जागेवर बसून राहण्यातच धन्यता मानत. एकूणच, एकेकाळी पक्षाचे लाडके असलेले राघव चड्ढा आता 'समोसा आणि पीआर'च्या मुद्द्यावरून पक्षातच थट्टेचा विषय ठरले असून, हा राजकीय कलह आगामी काळात कोणत्या वळणावर जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.