पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय : ६ ते १० एप्रिलदरम्यान लागू असतील निर्बंध

फोंडा: फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ एप्रिल रोजी होणारी निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने विविध निर्णय घेतले आहेत. त्यानुसार फोंडा येथील सरकारी बहुमजली इमारत परिसरातील पार्किंग लॉटमध्ये सर्व प्रकारच्या खासगी वाहनांच्या पार्किंगवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
हा आदेश ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून लागू होईल व १० एप्रिलपर्यंत अंमलात राहील. यामध्ये तिस्क-फोंडा येथील सरकारी बहुमजली इमारत संकुलाच्या संपूर्ण पार्किंग परिसराचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ८ एप्रिल रोजी मतदान पथकांचे प्रस्थान आणि ९ एप्रिल रोजी मतदानानंतर ईव्हीएम (EVM), व्हीव्हीपॅट (VVPAT) व इतर निवडणूक साहित्याचे संकलन याच ठिकाणी होणार आहे. या प्रक्रियेदरम्यान वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखली जावी, यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कौशिक डी. आमोणकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या पार्किंग बंदीतून भारतीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांची अधिकृत वाहने, कर्तव्यावर असलेले पोलीस, दंडाधिकारी व निवडणूक अधिकारी यांची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि सक्षम प्राधिकरणाने विशेष परवानगी दिलेली आपत्कालीन वाहने यांना सवलत देण्यात आली आहे.
फोंडा पोलीस निरीक्षक आणि फर्मागुडी येथील वाहतूक कक्षाला या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करून पार्क केलेली वाहने ओढून नेण्याची किंवा जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.