सत्तरी तालुक्यात बुकिंग करूनही मिळेना सिलिंडर

१५ दिवसांपासून पुरवठा विस्कळीत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
सत्तरी तालुक्यात बुकिंग करूनही मिळेना सिलिंडर

वाळपई : सत्तरी तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून गॅस सिलिंडरच्या वितरणाबाबत नागरिकांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने गॅसधारकांच्या तक्रारीत वाढ झाली असून, ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वाळपई नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन नागरिकांची ही समस्या दूर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक ठिकाणी गॅसची टंचाई जाणवू लागली आहे. सरकारने सर्वांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळेल असे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र सत्तरीत पाहायला मिळत आहे. दर आठवड्याला होणारा गॅस पुरवठा आता पंधरा-पंधरा दिवस होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

गॅस सिलिंडर संपल्याने लोकांचे दैनंदिन स्वयंपाकाचे वेळापत्रक कोलमडले आहे. सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सरकारने सर्वांना सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्ष वितरणात मोठी तफावत असल्याचे गॅसधारकांचे म्हणणे आहे. ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

सत्तरी तालुक्यामध्ये प्रामुख्याने दोन कंपन्यांमार्फत गॅस पुरवठा केला जातो. इंडेन गॅसचा पुरवठा वाळपई येथील कार्यालयातून होतो, तर एचपी गॅसचा पुरवठा साखळी येथून केला जातो. गॅसधारकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एचपी गॅसच्या वितरण सेवेमध्येच मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वाळपई येथील नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संभ्रमावस्था त्वरित दूर करावी, अशी विनंती गॅसधारकांनी केली आहे.

‘ओटीपी’ प्रक्रियेचा ग्राहकांना फटका

गॅस बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. युद्ध सुरू झाल्यापासून गॅस वितरणाची प्रक्रिया बदलली असून, आता बुकिंग केल्यावर संबंधित ग्राहकाच्या मोबाईलवर ‘ओटीपी’ येणे बंधनकारक झाले आहे. हा ओटीपी वितरकाला दिल्याशिवाय सिलिंडर मिळत नाही. मात्र, अनेक ग्राहकांना हा ओटीपीच येत नसल्याने त्यांची मोठी धावपळ उडाली आहे. यापूर्वी अशी जाचक प्रक्रिया नसल्याने ग्राहकांना सहज सिलिंडर मिळत होते, मात्र आता ही प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे. 

हेही वाचा