बायणा उड्डाणपुलावरून पडून वास्को येथील तरुणाचा मृत्यू

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
05th April, 10:18 pm
बायणा उड्डाणपुलावरून पडून वास्को येथील तरुणाचा मृत्यू

वास्को : येथील आयओसी जंक्शनजवळ असलेल्या बायणा उड्डाणपुलाच्या सुरक्षा कठड्यावर दुचाकी आदळली. या धडकेनंतर पुलावरून खाली जमिनीवर पडून एका २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना शनिवारी घडली. भुटेभाट-बायणा येथील रहिवासी असलेला गिरीश राम गुरखा (वय २३) हा तरुण, आपली केटीएम ड्यूक ही दुचाकी (क्रमांक जी. ए. ०६क्यू ३१३८) घेऊन वास्कोकडून बायणाच्या दिशेने जात होता. उड्डाणपुलावरून प्रवास करत असताना, त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी बाजूच्या सुरक्षा कठड्यावर जोरात आदळली. या धडकेच्या तीव्रतेमुळे तो पुलावरून खाली फेकला गेला आणि जमिनीवर पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापती झाल्या. या घटनेत त्याच्यासोबत दुचाकीवर मागे बसलेल्या सहप्रवाशाला किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

अपघातानंतर, गिरीश गुरखा याला १०८ रुग्णवाहिकेने चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला रुग्णालयात आणले तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता, असे पोलिसांना कळविण्यात आले.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी ‘मोटार वाहन अपघात’ म्हणून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा