
फोंडा : खांडेपार येथील नवीन पुलावरून रविवारी सकाळी संजना संजीव गावडे (४५, कुंकळ्ये - वेलिंग) या महिलेने दूधसागर नदीत उडी घेतली. गंभीर अवस्थेत तिला पोलिसांनी पाण्याबाहेर काढून इस्पितळात दाखल केले होते. परंतु, दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास गोमेकॉत उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
कुंकळ्ये - वेलिंग परिसरात राहणारी महिला रविवारी सकाळी आपल्या मुलाच्या स्कूटरवरून माहेरी जात होती. खांडेपार येथील नवीन पुलावर पोचल्यानंतर अचानक महिलेने आपल्या मुलाला स्कुटर थांबविण्यात सांगितले. पुलाजवळ स्कूटर थांबविल्यानंतर तिने त्वरित पुलावरून नदीत उडी घेतली. आईने नदीत उडी घेतल्याचे पाहून तिच्या मुलाने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या रॉबर्ट वाहनातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्याने पुलावरून उडी घेतलेली महिला जखमी अवस्थेत पाण्यात अडकून राहिली. पोलिसांनी महिलेला बाहेर काढून त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. तिच्या दोन्ही पायांना तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला अधिक उपचारासाठी गोमेकॉत पाठविण्यात आले. दुपारी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन वेळीप तपास करीत आहेत.