अल्पवयीन पीडितेने लैंगिक संबंधांना संमती दिली तरी तो गुन्हाच!

पॉक्सो न्यायालयाने फेटाळला बार्देशमधील युवकाचा जामीन अर्ज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd April, 11:10 pm
अल्पवयीन पीडितेने लैंगिक संबंधांना संमती दिली तरी तो गुन्हाच!

पणजी : पीडिता अल्पवयीन असल्याने तिने लैंगिक संबंधांना संमती दिली असली किंवा नसली, तरीही कायद्यानुसार तो एक गुन्हाच ठरतो. तसेच पीडित मुलीची न्यायालयात उलटतपासणी झाली नाही. संशयित तिला धमकी देऊन तिच्यावर दबाव टाकण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण नोंदवून पणजी येथील पाॅक्सो न्यायालयाने बार्देश तालुक्यातील २३ वर्षीय युवकाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याबाबतचा आदेश न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.

तिसवाडी तालुक्यातील १७ वर्षीय मुलीने पणजी महिला पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, बार्देश तालुक्यातील २३ वर्षीय युवकाने ८ मार्च रोजी तिच्याशी इन्स्टाग्रामवरून मैत्री केली. दुसऱ्या दिवशी ९ मार्च रोजी ते दोघे बार्देश तालुक्यातील एका हॉटेलमध्ये भेटले. त्यावेळी युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने म्हटले आहे.

पणजी महिला पोलीस स्थानकाच्या निरीक्षक मीरा डिसिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली गोवेकर यांनी सदर युवकाविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. युवकाला न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच दरम्यान संशयित युवकाने पणजी येथील पाॅक्सो न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यात तो निर्दोष असून त्याला खोट्या गुन्ह्यात त्याला संशयित केल्याचा दावा केला. तसेच ती स्वतःहून त्याच्याबरोबर हॉटेलात गेली होती. कोणतीही सुज्ञ व्यक्ती, ज्याला ती पहिल्यांदाच भेटली आहे, अशा व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये जाणार नाही, असा दावा युवकाच्या वकिलाने न्यायालयात केला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून जामीन अर्ज फेटाळून लावला. 

हेही वाचा