ताटात कमी चिकन वाढल्यावरून हमालाचा सहकाऱ्याकडून खून

सावंगखोबा सिंगला अटक : म्हापसा पोलिसांकडून कान कापलेल्या मृतदेहाबाबत उलगडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd April, 11:05 pm
ताटात कमी चिकन वाढल्यावरून हमालाचा सहकाऱ्याकडून खून

म्हापसा : बोडगिणी येथे कान कापलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचा छडा लावण्यात म्हापसा पोलिसांना यश आले. पार्टीवेळी ताटात चिकन कमी वाढल्याच्या वादातून हा खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सावंगखोबा चाओबा सिंग (४३, रा. बोडगिणी व मूळ बिन्नाकंडी आसाम) या संशयित आरोपीच्या मुसक्या पाच दिवसांनी आवळल्या.

सावंगखोबा व हमाल हे दोघे बेघर असून ते हमाली करीत. दि. २७ मार्च २०२५ रोजी नवीन कदंब बस स्थानकाच्या मागील बाजूस बोडगिणी येथे मरड बाजूने हमालावर प्राणघातक हल्ला झाला होता. तिथेच तिघेजण पार्टी करत होते. रस्त्यावर राहणाऱ्या तिघा मित्रांनी चिकन आणि दारू पार्टीचा बेत आखला. शेत जमिनीत बसून जेवत असताना संशयित सावंगखोबा सिंग याच्या ताटात चिकन कमी आले. आपल्याला कमी चिकन वाढल्याच्या कारणावरून त्याने हमालाशी वाद घातला. यातून दोघांमध्ये खडाजंगी झाली. याचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयिताने रागाच्या भरात बिअरची बाटली फोडली आणि हल्ला केला. कान व चेहऱ्यावर त्याने ताकदीने वार केले. या हल्ल्यात त्या हमालाचा कान मुळापासून कापला गेला.

त्यानंतर त्याला रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच टाकून संशयित आरोपी आणि त्यांच्या तिसऱ्या मित्राने तिथून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत हमाल काही अंतरावर गेला आणि तिथे पडला. अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

खूनी हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी हा म्हापशातच होता. म्हापसा पोलिसांनी संशयिताचा माग काढला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक नवीन देसाई हे करत आहेत.

पाठलागानंतर संशयित जेरबंद

खुनाची घटना दुसऱ्या दिवशी दि. २८ रोजी सकाळी ८ वा. सुमारास उघडकीस आली होती. शवचिकित्सा अहवालाच्या आधारे पोलिसांनी ३० मार्च रोजी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करीत तपासचक्रे गतीने फिरवली होती. ३ एप्रिल रोजी पोलिसांनी संशयिताचा माग काढला आणि त्याला अटक केली. पोलिसांना पाहून संशयिताने धूम ठोकली, मात्र अर्धा किलोमीटर अंतरावर पाठलाग करीत पोलिसांनी त्याला पकडले. 

हेही वाचा