मुख्यमंत्री स्टॅलीनच्या नातवाचे अपहरण करण्याची धमकी

बेंगळुरू : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (Defence Research and Development Organisation (DRDO)) (डिआरडीओ) अंतर्गत असलेल्या गॅस टर्बाइन रिसर्च इस्टॅब्लिशमेंट (GTRE) या महत्त्वाच्या संशोधन केंद्राला बॉम्बस्फोटने उडवून देण्याची धमकी देणारे ई-मेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना बेंगळुरू (Bengaluru) येथे घडली. तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांचे नातू इनबनिधी यांचे अपहरण करण्याची धमकीही या ई-मेलमधून देण्यात आली होती. एकूण या प्रकारामुळे शहरातील संरक्षण संबंधित संस्थांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीटीआरई (GTRE) कार्यालयाला अनेक ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. या ई-मेलमध्ये संस्थेच्या परिसरात आयईडी (Improvised Explosive Devices) लावल्याचा दावा करण्यात आला होता आणि दुपारी सुमारे १:३० वाजता स्फोट होईल, असे नमूद करण्यात आले होते.
शोधमोहीमेत स्फोटक सामग्री आढळली नाही
धमकी मिळताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने संपूर्ण परिसर रिकामा करून सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, दीर्घ शोधमोहीमेनंतर कोणतीही स्फोटक सामग्री आढळली नाही आणि ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले.
स्टॅलीनच्या नातवाचे अपहरण करण्याची धमकी
या ई-मेलमध्ये आणखी एक धक्कादायक इशाराही देण्यात आला होता. एम. के. स्टॅलीन (M. K. Stalin) यांचा नातू इनबनिधी याचे अपहरण करण्याचा कट असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, किरुथिथा.उदयनिधी ('Kiruthiha.udhayanidhi@hotmail') या आयडीवरून हा ई-मेल पाठवण्यात आला होता. या प्रकरणी सेंट्रल क्राइम ब्रँचने तपास तीव्र केला असून; आरोपीचा शोध सुरू आहे.दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व संरक्षण संबंधित संस्थांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.