हल्ल्यात इराण गार्ड्सच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू

होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव वाढला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
55 mins ago
हल्ल्यात इराण गार्ड्सच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू

तेहरान : मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. अमेरिका-इस्रायल (USA-Israel) आणि इराण (Iran)  यांच्यातील संघर्षाने धोकादायक वळण घेतले आहे. सोमवारी झालेल्या अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या (Revolutionary Guards) गुप्तचर विभागाचे प्रमुख मेजर जनरल माजिद खदेमी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

इराणने प्रत्युत्तरादाखल कुवेतमधील अमेरिकन सैन्य ठिकाणांना लक्ष्य केल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात तणाव आणखी वाढला आहे.

डोनाल्ड ट्रम्प आज देणार निवेदन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी या संघर्षावर आज रात्री (भारतीय वेळेनुसार १०:३० वाजता) महत्त्वपूर्ण निवेदन देण्याची घोषणा केली आहे. या निवेदनात इराणमध्ये पाडण्यात आलेल्या अमेरिकन एफ-१५इ (F-15E) लढाऊ विमानातील दोन वैमानिकांच्या सुटकेबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.

सामुद्रधुनी खुली करा : ट्रम्प

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर (Straight of Hormuz)  अंशतः नाकेबंदी केल्याने जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे. जगातील सुमारे २०% कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होत असल्याने ऊर्जा बाजारावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. ट्रम्प यांनी इराणला ही सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा इशारा देत कठोर कारवाईची धमकी दिली आहे.

बेरुतमध्ये हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण 

याच दरम्यान, लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये इस्रायलने दिलेल्या इशाऱ्यानंतर हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून; अनेक नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

भारताची भूमिका महत्त्वाची ठरू शकते 

दरम्यान, भारताची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फथाली ( Mohammad Fathali) यांनी म्हटले आहे. भारताने संयम आणि संवादाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी कौतुक केले.

४५ दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव 

संघर्ष थांबवण्यासाठी इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांच्या मध्यस्थीने ४५ दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव दोन्ही देशांना देण्यात आला आहे. मात्र, अमेरिका आणि इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

संपूर्ण परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून; येत्या काही दिवसांत या संघर्षाचे परिणाम अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा