'देश चंद्रावर पोहोचला, पण रस्ता दारात पोहोचला नाही'; ओवळेच्या परशुरामने मांडली व्यथा

ओवळे येथील एका महिलेचा काल उपचारांत विलंब झाल्याने झाला होता मृत्यू.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
54 mins ago
'देश चंद्रावर पोहोचला, पण रस्ता दारात पोहोचला नाही'; ओवळेच्या परशुरामने मांडली व्यथा

पणजी : आमचा देश २१ व्या शतकात चंद्रावर पोहोचला आहे, पण दुर्दैवाने २०२६ मध्येही माझ्या घरापर्यंत रस्ता पोहोचू शकलेला नाही. वेळेवर उपचार न मिळाल्याने मी आज माझी आई गमावली आहे, अशा शब्दांत सत्तरी तालुक्यातील ओवळे येथील परशुराम प्रभू या तरुणाने आपली हृदयद्रावक व्यथा सोशल मीडियाद्वारे मांडली आहे. ओवळे येथे एका बेशुद्ध रुग्णाला वाचवण्यासाठी '१०८' रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आरोग्य मंत्र्यांनी काल कौतुक करणारा व्हिडिओ शेअर केला होता. दरम्यान परशुरामने आज समोर येऊन काल नेमके काय घडले यावर भाष्य केले.




नेमकी घटना काय?

ओवळे येथील परशुराम प्रभू यांची आई अचानक बेशुद्ध पडल्याने कुटुंबीयांनी तातडीने '१०८' रुग्णवाहिकेला पाचारण केले होते. मात्र, घरापर्यंत पक्का रस्ता नसल्याने रुग्णवाहिका सुमारे २ किलोमीटर लांबच उभी राहिली. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर घेऊन डोंगर-दऱ्यांच्या वाटेने २ किलोमीटरची पायपीट केली. बेशुद्ध महिलेला स्ट्रेचरवरून खांद्यावरून वाहत पुन्हा २ किलोमीटर मजल दरमजल करत मुख्य रस्त्यावरील रुग्णवाहिकेपर्यंत आणले गेले.

उपचारांना उशीर आणि दुर्दैवी अंत

रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचेपर्यंत बराच वेळ खर्च झाला होता. तेथून रुग्णाला तातडीने साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना बांबोळी येथील गोव्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याची तयारी सुरू होती, परंतु दुर्दैवाने उपचारांना सुरुवात होण्यापूर्वीच या महिलेने प्राण सोडले. जर घरापर्यंत रस्ता असता, तर मी माझ्या आईला स्वतःच्या गाडीतून तातडीने नेले असते आणि कदाचित ती आज जिवंत असती, असे परशुरामने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 



माझा भूतकाळ बदलू शकत नाही, पण भविष्य वाचवा

परशुराम प्रभू यांनी प्रशासनावर थेट टीका न करता आपली परिस्थिती मांडली. त्यांच्या घरात आता ८५ वर्षीय आजी आणि ६० वर्षांवरील वडील व काका असे तीन ज्येष्ठ नागरिक आहेत. माझ्या आईच्या बाबतीत जे घडले, ते भविष्यात माझ्या घरातील इतरांच्या बाबतीत घडू नये. मला कोणावर आरोप करायचे नाहीत, पण आम्हा लोकांसाठी सरकारने किमान रस्ता तरी बांधून द्यावा, अशी विनंती त्यांनी संबंधितांकडे व्हिडिओद्वारे केली आहे. 

या घटनेमुळे सत्तरीतील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला स्मार्ट सिटी आणि तंत्रज्ञानाच्या गप्पा मारल्या जात असताना, ये-जा करण्यासाठी माणसांना साधा रस्ताही उपलब्ध नसल्यामुळे एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.