सकाळी सहाच्या सुमारास मानवी वस्तीत शिरून हत्तीने मारली ओम्नी कारला धडक

पणजी : उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील कडशी-मोपा परिसरात परतलेल्या 'ओंकार' हत्तीने पुन्हा एकदा आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपासून या भागात धुमाकूळ घालणाऱ्या 'ओमकार'ने आज सोमवारी पहाटेच्या सुमारास थेट लोकवस्तीत प्रवेश करून स्थानिकांनी घराबाहेर पार्क करून ठेवलेल्या वाहनांची नासधूस केली. यात एका मारुती ओम्नी कारचे आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, वन विभागाच्या कार्यक्षमतेवर आता स्थानिक रहिवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास जेव्हा बहुतांश नागरिक आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करत होते, तेव्हाच या हत्तीने लोकवस्तीत शिरकाव केला. कडशी येथील उमेश शंकर गाड यांच्या घराबाहेर उभी असलेली मारुती ओम्नी कार हत्तीने लक्ष्य केली. हत्तीने कारला इतक्या जोराने धडक दिली की गाडीच्या काचा फुटून पत्र्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे, जवळच उभी असलेली गीतेश शेट्ये यांची 'फसिनो' दुचाकीही हत्तीने पाडली आणि तिची मोडतोड केली. सुदैवाने, हा सर्व प्रकार घडला तेव्हा तिथे कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी मालमत्तेचे मात्र नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा हत्ती केवळ बागायती शेती किंवा पिकांचे नुकसान करत होता, मात्र आता त्याने थेट घरांच्या अंगणात शिरून साहित्याची मोडतोड करण्यास सुरुवात केल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. पहाटेच्या वेळी मुले किंवा नागरिक कामानिमित्त बाहेर असतात, अशा वेळी हत्तीसमोर आल्यास त्यांच्या जीवाचे बरे-वाईट होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली असून, अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आहेत. मात्र, केवळ पंचनामे करून आणि तोकडी नुकसानभरपाई देऊन हा प्रश्न सुटणार नाही, अशी ठाम भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली आहे. वन विभागाने हत्तीला लोकवस्तीपासून दूर ठेवण्यासाठी तातडीने कुंपण किंवा हत्तीला नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्यासारखे ठोस उपाय योजावेत, अशी मागणी उमेश गाड आणि अन्य ग्रामस्थांनी केली आहे. वन्यजीव आणि मानवी संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.