चिखलकाला

जन्मलेल्या मुलांपासून वृद्धातला वृद्ध माणूस सगळेच देवावरील श्रद्धेने चिखलकाल्यात सहभागी होतात. पावसामुळे देवळाच्या पटांगणात चिखल झालेला असतो. बालकृष्ण सवंगड्यासोबत खेळले जाणारे कितीतरी पारंपरिक खेळ चिखलकाल्याच्या वेळी खेळले जातात.

Story: जत्रा |
3 hours ago
चिखलकाला

आषाढ महिना म्हणजे अतिवृष्टीचा महिना. पाऊस सुरू झाला की सरीवर सरी कोसळू लागतात. ढगांच्या गडगडाटाने आणि विजांच्या कडकडाटाने सारा आसमंत भरून जातो. उसंत न घेता पडणाऱ्या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागतात. सुसाट वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडतात. डोंगर-कपारीतील पावसाचे पाणी उंच कड्यावरून खाली झेपावल्याने ठिकठिकाणी धबधबे पहावयास मिळतात. निसर्गप्रेमी धबधब्यावर गर्दी करून आल्हाददायी वातावरणाचा मनसोक्त आनंद लुटताना दृष्टीस पडतात. पक्षी चोच पिसात खुपसून घरांच्या वळचणीला बसून पावसापासून आपला बचाव करताना दिसतात. अतिवृष्टीमुळे पुरासारखे प्रसंग ओढवतात. सारे जनजीवन विस्कळीत होते. पावसाला आसुसलेली धरतीमाता वर्षाऋतूच्या आगमनाने हर्षभरीत होते. जेवढे पाणी आपणामध्ये सामावून घेता येईल तेवढे पाणी सामावून घेते. पाणी आणि माती एकजीव झाल्याने ठिकठिकाणी चिखल निर्माण होतो.

आषाढ महिन्यातील पहिला सण म्हणजे आषाढी एकादशी, पाऊस, पाणी, वादळ, वारा या कशाचीही पर्वा न करता, विठ्ठल दर्शनासाठी गेलेला वारकरी वारी करून चिखल तुडवित पंढरपूरच्या विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन परत येतो. पावसाळा म्हणजे सण-उत्सवांचा शुभारंभ, नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, गणेशचतुर्थी हे सण याच दिवसात साजरे केले जातात. पाऊस - पाण्यामुळे घरात अडकून पडलेला मानवप्राणी यानिमित्ताने घराबाहेर पडतो.

गोव्यामध्ये काही ठिकाणी चिखलकाला साजरा केला जातो. चिखल म्हणजे पाणी मिश्रित माती, चिखल म्हणजे घाण. चिखल म्हणजे दलदल. या दलदलीमध्ये पाय आत गेला तर वर काढेपर्यंत आपल्या नाकीनऊ येते. नाही तरी कारणाशिवाय चिखलात नाचायला जातो तरी कोण! चिखलकाला म्हणजे मौजमजा करण्याचा दिवस. हिंदूचे सण उत्सव हे आनंददायीच असतात. पावसाळा सुरू झाला की सर्व माती पाणीमिश्रित होऊन मऊ होते. अशा या मातीमध्ये लोक नाचायला लागले की चिखल होतो. चिखलकाल्याच्या निमित्ताने लहान-थोर, अबाल-वृद्ध सगळेच चिखलामध्ये नाचतात, खेळतात. लहान मुले मातीत बसून मातीच्या वस्तू करण्याचा प्रयत्न करतात.

पायाला माती लागू नये म्हणून घरातही चप्पल वापरणारी मंडळी, झाडे लावण्यासाठी बागेत गेलेल्या मुलांना कपड्यांना माती लागणार म्हणून धपाटा देणारी आई, मातीत हात घातला तर ओरडणारे वडील त्याच मुलांसमवेत मातीचा आस्वाद घेतात. आजच्या दिवशी चक्क मातीत लोळतात, झोपतात. एकमेकांवर चिखल टाकत खेळतात. कारण हा परंपरागत उत्सव आहे मनसोक्त आनंद लुटण्याचा, उत्साहाचा, मातीप्रती आदरभावना निर्माण करण्याचा. अशा सण उत्सवातून आपल्याला खूप शिकायला मिळते. चार - चौघात मिसळल्याने मन प्रसन्न होते. जुने हेवेदावे विसरून वैमनस्य नष्ट होते. नवीन काही तरी शिकायची संधी प्राप्त होते. आरोग्य चांगले रहाते. या वरकरणी फायद्याबरोबरच अंतरंगामध्ये खूप चांगल्या गोष्टी दडलेल्या आहेत. जीवन जगण्यासाठी उदरनिर्वाहाची सोय व्हावी म्हणून माणूस सतत धडपडत असतो. त्यासाठी नवनवीन साधन सुविधा शोधून उद्योग व्यवसाय करीत असतो.

डोंगर - दऱ्यामध्ये रहाणारा आदिमानव, फळे, कंदमुळे, कच्चे मांस खाऊन जगत होता. कालांतराने तो विस्तवावर मांस भाजून खाऊ लागला. त्याला अन्न, वस्त्र, निवारा याची गरज भासली त्यावेळी त्याने शेती करायला सुरुवात केली. पावसाळा सुरू झाला की शेतकरी नांगर खांद्यावर घेऊन शेतात जातो. शेत नांगरतो, गुंढा फिरवून चांगला चिखल करतो. गुडघाभर चिखलात उभा राहून खूप कष्ट करून पीक काढतो. पोटभर अन्न मिळविण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. यासाठी माणसेही खूप लागतात. नांगरणी, पेरणी, लावणी, नडणी, कापणी ही सारी कामे चिखलांतच करावी लागतात. त्यामुळे चिखलात उभे रहाण्याची सवय असणाऱ्या व आवड असणाऱ्या माणसांची जास्त गरज असते. आपल्याला चिखलातून चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते याबद्दल शंकाच नाही. पण जो शेतकरी असतो तो चिखलातून सहज फिरू शकतो कारण चिखलातून फिरणे त्याच्या अंगवळणी पडलेले असते. अंगवळणी पडलेली कोणतीही गोष्ट करताना काहीही वाटत नाही ती सहज साध्य होते. त्याला शेतातल्या चिखलात फिरायला अजिबात त्रास होत नाही किंवा वाईट ही वाटत नाही तो हे काम आनंदाने करतो. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे शेतातील सर्व कामे घरातील माणसे मिळूनमिसळून करत असत आणि त्या चिखलाप्रती आदर भावना व्यक्त व्हावी, सर्वांना चिखलाची सवय व्हावी म्हणूनच पूर्वजांनी हेतूपुरस्सर चिखलकाला सारखा उत्सव सुरू केला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. आनंदाची देवाण - घेवाण करीत आनंदमय वातावरणात जीवनावश्यक गोष्टी साध्य करुन घेण्याची पद्धत खरोखरच वाखाणण्यासारखीच होती.

आपल्या जीवनात मातीला खूप महत्त्व आहे. पाऊस, वारा, ऊन यापासून रक्षण करण्यासाठी निवारा म्हणून आपण घर बांधतो त्यावेळी मातीची गरज भासते. घरापुढे तुळशीवृदांवन तेही मातीचेच, विस्तव पेटवण्यासाठी चूल, चुलीवर अन्न शिजवण्यासाठी लागणारे मडके सारे मातीचेच, मडके बनवण्यासाठी कुंभाराला माती पायाखाली तुडवून चिकट करावी लागते. मूर्तिकाराला मूर्ती तयार करण्यासाठी मातीची गरज असते. उपजतच मातीबद्दल प्रेम निर्माण झाले तरच तो पुढे मूर्तिकार तयार होईल. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सणाच्या वेळी देव मानून पुजल्या जाणाऱ्या मूर्ती यातर चिकण मातीपासूनच बनवलेल्या असतात.

श्रीकृष्णाला सुद्धा मातीत खेळायला आवडत होते. याच अनुषंगाने बालकृष्णाच्या बालक्रिडांवर आधारित माशेल गावामध्ये देवकीकृष्ण मंदिरात चिखलकाला साजरा केला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी ठीक बारा वाजता समई पेटवून २४ तास अखंड भजनी सप्ताह सुरू होतो. दुसऱ्या दिवशी द्वादशी या तिथीला १२ वाजता सप्ताहाची सांगता होते. सप्ताहाच्यावेळी पेटवून ठेवलेल्या समईतील तेल प्रत्येकजण आपल्या अंगाला लावतो. देवदर्शन घेऊन सर्व भक्तगण 'जय विठ्ठल, हरी विठ्ठल' असा गजर करीत देवकीकृष्णाच्या मैदानावर गोळा होतात. गावातील इच्छुक लोक यावेळी परंपरागत खाद्य पदार्थ उदा. पुरणपोळी, लाडू, चकली, बॉल आणून जमलेल्या लोकांना वाटतात. गव्हाचे पीठ, खोबरे, गूळ घालून तयार केलेला बॉल हा चिखलकाल्याच्या निमित्ताने बनवलेला खास पदार्थ असतो. 'गोपाळ गडी या हो, गोपाळ नाम घ्या हो, माझे गडी कोण कोण असतील सारे या हो या हो' असे म्हणत चिखलकाल्याची सुरुवात होते.

जन्मलेल्या मुलांपासून वृद्धातला वृद्ध माणूस सगळेच देवावरील श्रद्धेने चिखलकाल्यात सहभागी होतात. पावसामुळे देवळाच्या पटांगणात चिखल झालेला असतो. बालकृष्ण सवंगड्यासोबत खेळले जाणारे कितीतरी पारंपरिक खेळ चिखलकाल्याच्या वेळी खेळले जातात, जमीनचक्र, आईचा रूमाल, डोळे बांधणे यासारखे खेळ खेळताना मोठी माणसे छोटी होऊन लहानपणाचा आनंद लुटताना दिसतात. चिखलकाल्याच्यावेळी चिखलात खेळल्यास आजारातून बरे होतात अशी आजही लोकांची श्रद्धा आहे. मूल होत नसल्यास इथे नवस बोलल्याने मूल होते अशी श्रद्धा असल्याने सहा महिन्याच्या बाळालाही चिखलकाल्याच्या दिवशी चिखलात ठेवले जाते. साधारणतः १ ते २ तास खेळ खेळून झाल्यावर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर कृष्णाचे सर्व सवंगडी आंघोळीला जातात व पुन्हा मंदिरात येतात. आरती, तीर्थप्रसादाने चिखलकाल्याची सांगता होते. वरकरणी जरी आपण पाणी मिश्रित माती म्हणजे चिखल असे म्हटले तरी या मातीतूनच निर्माण झालेल्या या नैसर्गिक संपत्तीवर जगत असतो. आपल्या उदरभरणासाठी लागणारे सारे व्यवसाय-धंदे या चिखलावरच चालत असतात हे विसरून चालणार नाही. निरनिराळ्या सणाच्या वेळी देव मानून केलेल्या मूर्तीपूजा या तर आदिमानवाने मातीची पूजा करून आदर भावना व्यक्त करण्यासाठी साजरे केलेले सण आहेत. म्हणूनच असे परंपरागत सण-उत्सव विस्मृतीत न टाकता आनंदाने साजरे करणे अत्यंत गरजेचे आहे.

हेही वाचा