डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा : वीज प्रकल्प, पुलांवर हल्ले करण्याची धमकी

तंत्रज्ञान हाती लागू नये म्हणून अमेरिकेनेच स्फोटाने उडवून दिलेली इराणमध्ये पडलेली स्वतःची विमाने.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
वॉशिंग्टन : होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणवर मोठा हल्ला केला जाईल. इराणचे रूपांतर नरकात केले जाईल. इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांना लक्ष्य बनवले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. यावेळी ट्रम्प यांनी इराणला ‘हरामखोर’ असेही म्हटले.
रविवारी सोशल मीडियावर ट्रम्प यांनी लिहिले की, मंगळवारी इराणमध्ये वीज प्रकल्प दिन आणि पूल दिन एकाच दिवशी येत आहेत, याचा अर्थ हल्ला होईल. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली पाहिजे, अन्यथा ते नरकात पोहोचतील. यापूर्वी गुरुवारी अमेरिकेने तेहरानला कराज शहराशी जोडणाऱ्या बी १ महामार्गावरील पुलावर हल्ला केला होता. हा पूल यावर्षीच खुला करण्यात आला होता. तो मध्य पूर्वेतील सर्वात उंच पूल होता. सुमारे १,०५० मीटर लांब आणि १३६ मीटर उंच असलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ४०० दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ३,८०० कोटी रुपये) खर्च करण्यात आला होता.
इराणने फेटाळला ट्रम्प यांचा ‘अल्टिमेटम’
इराणने ट्रम्प यांचा ४८ तासांत होर्मुज खुली करण्याचा ‘अल्टिमेटम’ फेटाळून लावला आहे. इराणी सैन्याने म्हटले की, अमेरिका हतबल होऊन आणि घाबरून धमक्या देत आहे. ट्रम्पने इराणला होर्मुज उघडण्याचा किंवा समझोता करण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यांनी म्हटले होते की वेळ संपत आहे आणि असे न झाल्यास इराणच्या ऊर्जा ठिकाणांना लक्ष्य करून नष्ट केले जाईल.
२४ तासांत कुवेतवर डागली नऊ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे
गेल्या २४ तासांत आपल्यावर नऊ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, चार क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ३१ ड्रोनद्वारे हल्ला झाल्याचा दावा कुवेतने केला आहे. या हल्ल्यांमध्ये वीज, पाणी आणि तेल प्रकल्पांना लक्ष्य केले होते. इराकच्या सरकारी मालकीच्या ऑईल कंपनीने सांगितले की, ते दररोज ९ लाख बॅरल तेलाचे उत्पादन करत आहेत; परंतु होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे तेलाची निर्यात करू शकत नाहीत.
हिजबुल्लाहचे दोन गट नेस्तनाबूत केल्याचा इस्रायलचा दावा
इस्रायलने गेल्या २४ तासांत लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाहचे दोन गट नेस्तनाबूत केल्याचा दावा केला आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, ब्रिगेड २२६ च्या सैनिकांनी या गटांना ओळखले, त्यानंतर तात्काळ हवाई दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, इस्रायली हवाई दलाने कारवाई करून दोन्ही गटांना निष्प्रभ केले.
अमेरिकेने दिलेल्या धमकीत नवीन काहीच नाही. ४७ वर्षांत अमेरिका इराणचे काहीही करू शकली नाही आणि आताही काही करू शकणार नाही. अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले आहे, या ट्रम्प यांच्या दाव्याला आम्ही रणांगणावर आणि रस्त्यांवर प्रत्युत्तर देऊ शकतो. ते आधी म्हणायचे, आम्ही तीन दिवसांत इराणला हरवू; पण आता एका महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे.
_ डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही, इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी