पुढील काही दिवसांत आणखी एका पीडित युवतीचा जबाब होणार नोंद

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोन पीडित मुलींचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंद करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत आणखी एका पीडित युवतीचा जबाब नोंद केला जाणार आहे. संशयित सोहम नाईक गुन्हा शाखेच्या कोठडीत आहेत.
लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित सोहमविरोधात चार पीडितांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. दोन प्रकरणी कुडचडे पोलिसांनी गुन्हे दाखल करून गुन्हा शाखेकडे वर्ग केले होते. यातील एका पीडितेवर १४ वर्षांची असताना लैंगिक अत्याचार झाला होता. दुसऱ्या पीडितेला लैंगिक छळ करून धमकी देण्यात आली होती. दोन्ही प्रकरणांतील पीडित मुलींचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंद करण्यात आला आहे. वरील प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग झाल्यानंतर १४ वर्षीय मुलीने सोहमविरोधात तक्रार दाखल केली. त्यात पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. सदर घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांनी सोहमविरोधात पॉक्सो आणि गोवा बाल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. केपे येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सोहमला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. ती सोमवारी समाप्त होत आहे. गुन्हा शाखेने कुडचडे येथील एका फ्लॅटचा पंचनामाही केला आहे.
सोहमविरोधात गुन्हा शाखेत १९ वर्षीय युवतीने तक्रार दाखल केली. त्यात संशयित सोहमने लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केले. सदर घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करून ते व्हायरल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून सोहमवर गुन्हा नोंद आहे. या प्रकरणातील युवतीने वैद्यकीय चाचणीस नकार दिला आहे. पुढील एक-दोन दिवसांत आणखी पीडितांचे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंद केले जाणार आहेत.