बंद पडलेल्या ‘एमएसएमई’मध्ये ५४ टक्के महिला उद्याेजक

एमएसएमई मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालातून माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th April, 11:51 pm
बंद पडलेल्या ‘एमएसएमई’मध्ये ५४ टक्के महिला उद्याेजक

पणजी : गोवा राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात सुमारे ३८ टक्के उद्योगांचे नेतृत्व महिलांकडे आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात एमएसएमई उद्योग बंद पडल्याने महिला उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. बंद पडलेल्या उद्योगांपैकी तब्बल ५४ टक्के उद्योग हे महिला उद्योजकांचे असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी एमएसएमई क्षेत्रात महिलांच्या रोजगारात काही प्रमाणात वाढही नोंदवली गेली आहे.

एमएसएमई मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, राज्यात गेल्या पाच वर्षांत सुमारे १.३० लाख एमएसएमई उद्योग कार्यरत होते. यापैकी ५०,४११ उद्योग महिला उद्योजकांकडून चालवले जात होते.
२०२०-२१ या कालावधीत एमएसएमई क्षेत्राची स्थिती समाधानकारक होती. २०२३-२४ मध्ये उद्योगांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आणि त्यात महिला उद्योजकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता. मात्र, २०२४-२५ पासून या क्षेत्रात घसरण सुरू झाली असून त्याचा सर्वाधिक फटका महिला उद्योजकांना बसला आहे.
२०२३-२४ मध्ये एकूण ४६,०७५ एमएसएमई उद्योग कार्यरत होते, त्यापैकी २२,००२ उद्योग महिला उद्योजकांनी चालवले होते. परंतु २०२५-२६ मध्ये एकूण उद्योगांची संख्या घटून २२,१६९ वर आली असून महिला उद्योजकांचे उद्योग फक्त ८,६४५ इतके उरले आहेत.
दरम्यान, एमएसएमई क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत १.११ लाखांपर्यंत पोहोचली आहे. काही वर्षांमध्ये घट झाली असली तरी चालू वर्षात पुन्हा वाढ दिसून आली आहे.
महिला कर्मचाऱ्यांची वर्षनिहाय संख्या
२०२०-२१ : १४,९४९
२०२१-२२ : १४,०६०
२०२२-२३ : १९,६६०
२०२३-२४ : २१,६२४
२०२४-२५ : १८,७०५
२०२५-२६ : २२,३२२
बाॅक्स
वर्षनिहाय एमएसएमई उद्योगांची आकडेवारी:
वर्ष              एकूण एमएसएमई           महिला एमएसएमई

२०२०-२१      ५,९९२                            १,११४
२०२१-२२      ८,५५२                           १,८६२
२०२२-२३     १५,३९९                          ३,७२३
२०२३-२४     ४६,०७५                        २२,००२
२०२४-२५    ३१,९६४                         १३,०६५
२०२५-२६    २२,१६९                        ८,६४५

हेही वाचा