'ते' वक्तव्य बेजबाबदारपणाचेच! योग्य वेळी योग्य कारवाई करेन : दामू नाईक

मंत्री मॉविन गुदिन्होंच्या विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष नाराज

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
35 mins ago
'ते' वक्तव्य बेजबाबदारपणाचेच! योग्य वेळी योग्य कारवाई करेन : दामू नाईक

पणजी: गोव्याच्या राजकीय वर्तुळात सत्ताधारी भाजप आणि त्यांचा युतीतील घटक पक्ष मगो यांच्यात सध्या एका विधानावरून चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी मागे एका सत्कार समारंभात मगोपचे मांद्रे येथील आमदार जीत आरोलकर यांना पुढील निवडणूक भाजपतर्फे लढवण्याबाबत जे विधान केले होते, त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी या प्रकरणावर आता भाष्य केले आहे. पहा व्हिडिओ. 



आज पणजी येथील भाजप मुख्य कार्यालयात 'भाजप स्थापना दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या विधानाबाबत आपली भूमिका मांडली. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी जबाबदारीने वागणे गरजेचे. संबंधितांना अजूनही पक्षाची कार्यपद्धती माहीत नसेल तर ते बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. अध्यक्ष म्हणून संबंधितांवर योग्य वेळी योग्य कारवाई करेन. भाजपमध्ये कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी वेळोवेळी कार्यशाळा घेतल्या जातात, यामध्ये पक्षाची धोरणे आणि शिस्तीवर भर दिला जातो. उठसुठ बेताल वक्तव्य करण्याची मुभा पक्षाने कुणालाही दिलेली नाही, नेत्यांनी ते लक्षात घेणे गरजेचे आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण योग्य वेळी योग्य कारवाई करू, असे संकेत त्यांनी दिले.




याचवेळी दामू नाईक यांनी फोंडा पोटनिवडणुकीवरही भाष्य केले. भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढत असून, ३,५०० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, भाजप कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही आणि हेच पक्षाच्या यशाचे सूत्र आहे. 

Mauvin Urges Jit Arolkar To Join BJP, MLA Says Decision At Right Time -  Goemkarponn - Goa News


दोन दोन दिवसांपूर्वी मगोपचे केंद्रीय समितीचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली. गुदिन्हो यांच्या विधानामुळे मगोपचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण होऊ शकतो, असे सांगत त्यांनी या विधानाचा निषेध केला. ढवळीकर म्हणाले की, आमदार जीत आरोलकर हे मगोपशी एकनिष्ठ आहेत आणि त्यांनी स्वतः ही बाब स्पष्ट केली आहे." तसेच, जेव्हा दोन पक्षांची अधिकृत युती असते, तेव्हा अशा प्रकारची विधाने करणे युती धर्माला धरून नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी अशा विधानांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे सांगून, गुदिन्हो यांनी दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत बाबींत लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या पक्षाच्या कामावर लक्ष केंद्रित करावे, असेही ढवळीकर यांनी सुचवले.