
मडगाव: लग्नाचे आश्वासन देऊन २५ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या सुभाष लमाणी (वय २६, मूळ रा. कर्नाटक) या तरुणाला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.
पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या काळात संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, जेव्हा तिने लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनंतर कोलवा पोलिसांनी ३१ मार्च रोजी संशयित सुभाष लमाणी याला अटक केली होती.
न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, "दोघांमध्ये प्रेमसंबंध होते व प्रस्थापित झालेले शारीरिक संबंध हे परस्पर संमतीने होते. पीडिता २५ वर्षांची असून स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहे. लग्नाचे वचन पूर्ण न होणे म्हणजे प्रत्येक वेळी बलात्कार ठरत नाही. या प्रकरणात संशयिताच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध असल्याने त्याने लग्नास नकार दिल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडण्यात आला.
प्रकरण तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असले तरी संशयिताचा पत्ता निश्चित असल्याने त्याला कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेचा एक जामीनदार सादर करण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर केला. तसेच, संशयिताला राज्याबाहेर जाण्यास बंदी घातली असून, पीडितेशी किंवा साक्षीदारांशी कोणताही संपर्क न ठेवण्याचे आदेश दिले आहेत.