
पणजी: पणजीनजीकच्या दोनापावला परिसरात रविवारी एका आलीशान कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीक्षा परवारकर असे मृत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दोनापावला येथील मणिपाल हॉस्पिटलच्या अगदी जवळ घडला. अतिवेगाने जाणाऱ्या एका आलीशान कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दीक्षा आणि तिचा सहकारी दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दीक्षाला जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
या अपघातात जखमी झालेला दुसरा तरुण गंभीर असून, त्याच्या डोक्याला आणि पायाला मोठी इजा झाली आहे. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कारचा वेग प्रचंड असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही दुर्घटना घडली. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दोनापावला आणि मळभाट परिसरातील रस्ते रुंद असल्याने अनेकदा चालक या भागात वाहने वेगाने चालवतात. मणिपाल रुग्णालयाचा परिसर हा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या वर्दळीचा असल्याने येथे वाहनांच्या वेगावर मर्यादा असणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारे झालेल्या अपघातामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.