लाचेनमध्ये ८०० पर्यटक अडकले; रस्ता खचल्याने संपर्क तुटला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
27 mins ago
लाचेनमध्ये ८०० पर्यटक अडकले; रस्ता खचल्याने संपर्क तुटला

गंगटोक (सिक्कीम) : सिक्कीम (Sikkim) राज्यातील मंगन जिल्ह्यातील (Mangan District)  लाचेन (Lachen)  परिसरात तब्बल ८०० पर्यटक अडकून पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लाचेन–चुंगथांग मार्गावरील तारुम चू पुलाजवळ रस्ता खचल्यामुळे हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला असून, पर्यटकांची अडचण वाढली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, असुरक्षित हवामान आणि रस्त्यावरील धोका लक्षात घेता सर्व पर्यटकांना सध्या जिथे आहेत तिथेच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी कोणतीही हालचाल टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बचाव मोहीम राबवणार : प्रशासन

दरम्यान, अडकलेल्या पर्यटकांच्या (Tourist) सुटकेसाठी प्रशासनाने सोमवारी सकाळपासून बचाव व स्थलांतर मोहीम राबवण्याची योजना आखली आहे. हवामान सुधारल्यास आणि डोंगक्या ला मार्गावरील बर्फ हटवण्याचे काम पूर्ण झाल्यास, लाचेन–डोंगक्या ला–लाचुंग–गंगटोक या मार्गाने पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले जाणार आहे.

विविध यंत्रणा राबवतात मोहीम 

या मोहिमेसाठी पोलीस (Police), आयटीबीपी (ITBP), बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) आणि भारतीय लष्कर यांच्यासह विविध यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. रस्ता दुरुस्ती आणि बर्फ हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, परिस्थितीचा आढावा घेऊनच स्थलांतराची अचूक वेळ निश्चित केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती असून, प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा