इराण-अमेरिका संघर्ष तीव्र; इराणमधील अणुऊर्जा केंद्राजवळ हल्ल्यानंतरही किरणोत्सर्ग वाढला नाही

संयुक्त राष्ट्रांची माहिती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
43 mins ago
इराण-अमेरिका संघर्ष तीव्र; इराणमधील अणुऊर्जा केंद्राजवळ हल्ल्यानंतरही किरणोत्सर्ग वाढला नाही

तेहरान/दमास्कस : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षाने शनिवारी आणखी तीव्र रूप धारण केले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एनर्जी एजंसी (International Atomic Energy Agency (IAEA) या संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा निरीक्षक संस्थेने इराणमधील अणुऊर्जा केंद्राजवळ हल्ला झाल्यानंतरही “किरणोत्सर्गाच्या पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही” असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संभाव्य अणुउपद्रवाचा धोका सध्या टळल्याचे मानले जात आहे.

दमास्कस ( Damascus)  आणि आसपासच्या भागात जोरदार स्फोट झाले असून, सिरियन सरकारी माध्यमांनी राजधानीत विविध ठिकाणी हल्ल्यांची नोंद केली आहे. हे हल्ले इराण-अमेरिका युद्धाशी संबंधित सीमापार कारवायांचा भाग असल्याचे मानले जात आहे.

इराणने शुक्रवारी अमेरिकेचे ए-१० थंडरबोल्ट २ (A-10 Thunderbolt II)  हे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे.  हा दुसरा असा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. बहरीनमधील सितरा भागात इराणी ड्रोन रोखताना उडालेल्या तुकड्यांमुळे चार नागरिक जखमी झाले, तसेच काही घरांचे नुकसान झाले आहे.

दक्षिण लेबनॉनमध्ये हेज्बुल्लाहने (Hezbollah) इस्रायली सैन्यावर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला आहे. इस्त्रायलने (Israel) तेहरानहून डागण्यात आलेली नवी क्षेपणास्त्रे रोखल्याचे सांगितले आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्क‌ियान (Masoud Pezeshkian) यांनी अमेरिकेवर “दहशतवादाचा” आरोप करत, त्यांच्या परराष्ट्र धोरण परिषदेच्या प्रमुखावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा उल्लेख केला. त्यांनी अमेरिकेच्या ४८ तासांच्या युद्धविराम प्रस्तावालाही नकार देत हल्ले सुरूच ठेवण्याचा इशारा दिला.

पेंटागॉनच्या (Pentagon) माहितीनुसार, या संघर्षात आतापर्यंत २४७ अमेरिकन सैनिक जखमी झाले असून; १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

राजनैतिक पातळीवरही तणाव वाढला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळामध्ये (United Nations Security Council) होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेबाबतचा ठराव पुढे ढकलण्यात आला आहे. चीनने (China)  लष्करी कारवाईला विरोध दर्शवला आहे. युनायटेड किंग्डम (United Kingdom)  मध्ये ४० हून अधिक देशांची सुरक्षा बैठक झाली आहे.

दरम्यान, नाटो (NATO)  प्रमुख मार्क रुट्टे हे ८ ते १२ एप्रिलदरम्यान अमेरिकेला भेट देणार असून; ते डोनाल्ड ट्रम्प,  मार्को रुबीओ आणि पेटे हेगसेठ यांच्याशी चर्चा करणार आहेत.

रेसेप टी. इरडोगन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी चर्चा करत अमेरिका-इस्रायल हल्ले आणि इराणची प्रत्युत्तरा दाखल कारवाई या दोन्हींना विरोध दर्शवला असून मध्यस्थीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीजवळील परिस्थितीमुळे जागतिक तेलबाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संघर्ष अधिकच तीव्र होत असून; विविध आघाड्यांवर हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच आहेत.


हेही वाचा