इराणने पाडली अमेरिकेची दोन लढाऊ विमाने; लेबनॉनमध्ये इस्रायलची हवाई कारवाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
04th April, 10:10 am
इराणने पाडली अमेरिकेची दोन लढाऊ विमाने; लेबनॉनमध्ये इस्रायलची हवाई कारवाई

तेहरान : इराण-अमेरिका-इस्रायल (Iran-USA-Israel)  संघर्ष अधिकच तीव्र होत असून; इराणने दोन अमेरिकन लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. यातील एक विमान कोहगिलुयेह-बोयर अहमद प्रांतात पाडण्यात आले, तर दुसरे पर्शियन आखातात कोसळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत दोन अमेरिकी कर्मचारी बचावले असून; किमान एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

इराणच्या या कारवाईनंतर तेहरानमध्ये (Teharan) जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.  आपल्या सैन्याची ताकद अजूनही अबाधित असल्याचा दावा इराणी लष्कराने केला आहे. 

इस्त्रायलच्या औद्योगिक परिसरात आग : इराण 

दरम्यान, इराणकडून इस्रायलवर करण्यात आलेल्या प्रतिहल्ल्यांमुळे दक्षिण नेगेव भागातील औद्योगिक परिसरात आग लागल्याची, तसेच रोश हाआयिन आणि पेटाह टिक्वा या शहरांमध्ये इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

इस्त्रायलने लेबनॉनमध्ये दोन पूल उडवले

या पार्श्वभूमीवर इस्रायलनेही लेबनॉनमध्ये (Lebanon)  कारवाई तीव्र करत लितानी नदीवरील दोन महत्त्वाचे पूल उडवून दिले आहेत. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्याची हालचाल वाढत असल्याचे वृत्त आहे. याशिवाय जेज्झीन जिल्ह्यातील अल-कतरानी भागात इस्रायलने हवाई हल्ला केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, इराणच्या संसदाध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीबाबत सूचक इशारा दिला आहे. या मार्गावरून जागतिक व्यापारातील सुमारे १४ टक्के मालवाहतूक होते, ज्यामध्ये सुमारे ५ टक्के तेल पुरवठ्याचाही समावेश आहे. त्यामुळे या भागातील तणावामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिझ्बुल्लाचा इस्त्रायली सैन्यावर रॉकेट हल्ला 

याचवेळी लेबनॉनमधील हिझ्बुल्ला संघटनेने इस्रायली सैन्यावर रॉकेट हल्ला केल्याचा दावा केला आहे. मरून अल-रास या सीमावर्ती भागात इस्रायली हेलिकॉप्टर लँडिंग पॅडजवळ हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव वाढत असून परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा